Advertisement

ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार वाढू लागले;बीडमध्ये दोघांना लाखाला गंडविले

प्रजापत्र | Saturday, 12/12/2020
बातमी शेअर करा

बीड-देशात मागील काही महिन्यांपासून ऑनलाईन अँपच्या माध्यमातून फ्रॉडच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या आहेत. बीडमध्ये दोघांना ऑनलाईन अँपच्या माध्यमातून लाखाला गंडविल्याचे समोर आले असून याप्रकरणी बीड शहर आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष चौरे हे व्यापारी असून त्यांचे सावतामाळी चौकात दुकान आहे. २ डिसेंबर रोजी एका अनोळखी इसमाने चौरे यांच्याशी करून ‘पाण्याच्या टाक्याचे १३ हजार ६०० रुपयांचे बील तुमच्या खात्यावर जमा करतो’असे सांगितले. नंतर त्याने चौरे यांचा अकांऊट नंबर घेवून गुगल पे च्या माध्यमातून बारकोड स्कॅन करण्याचे सांगितले. चौरेनी बारकोड स्कॅन केल्यानंतर एक मिनिटाच्या फरकाने एकुण ९ ट्रान्जेक्शन होवून ४७ हजारांची रक्कम विड्राल झाली. यावेळी चौरे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बीड शहर ठाण्यात फिर्याद नोंदवली.याप्रकरणी  अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. 
तर फसवणूकीची दुसरी घटना शिवाजीनगर ठाणे हद्दीतील एका महिलेच्या बाबतीत घडली. सुनीता जायभाये (रा.बीड) यांना शुक्रवारी (दि.११) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास एका भामट्याने कॉल केला. ‘फोन पे कंपनीचे राकेश शर्मा बोलत आहे, तुम्हाला ‘फोन पे’ कंपनीकडून ‘अमाउंट रिप्लेसमेंट’ची ऑफर आहे’ असे सांगत नंतर त्या भामट्याने जायभाये यांना ‘तुम्ही फोन पे अ‍ॅप उघडा. व एका अंकाऊंटवर तुमचे फोन पे चे युपीआय नंबर टाका, त्यानंतर तुम्हाला पैसे जमा होतील’ असे सांगत विश्वास संपादन केला. ही ऑनलाईन प्रक्रिया करताच जायभाये यांच्या खात्यातून तीन वेळेस ४८००, एक वेळेस ५ हजार, त्यानंतर ९८००, नंतर दोन वेळेस १० हजार व नंतर २ हजार अशा आठ ट्रान्जेंक्शनमधून सुमारे ५१ हजार २०० रुपयांची रक्कम परस्पर काढून घेण्यात आली. त्यानंतर जायभाये यांनी शिवाजीनगर ठाण्यात येवून तक्रार नोंदवली. या प्रकरणी अज्ञाताविरुध्द फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Advertisement

Advertisement