Advertisement

जाहिरातीवरून शिंदे गट-भाजपा नेते भिडले

प्रजापत्र | Thursday, 15/06/2023
बातमी शेअर करा

राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिंदे गटात काही दिवसांपासून काही ना काही कारणावरून वादाची ठिणगी पडताना दिसत आहे. आधी ठाण्यातील वादानंतर भिडलेले भाजपा-शिंदे गटाचे नेते नंतर एकनाथ शिंदे यांना सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीवरून आमने-सामने आलेले पाहायला मिळाले. यानंतर आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर भाषणात यावर भाष्य केलं. ते गुरुवारी (१५ जून) पालघरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरलो. एक पत्रकार आला आणि म्हणाला की, तुम्ही दोघांनी एकत्र प्रवास केला. कसं वाटतं आहे? आमचा २५ वर्षांपासून एकत्र प्रवास आहे, पण गेल्यावर्षभरात तो अधिक घट्ट आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कुणीही करण्याची गरज नाही.”

 

“आमचा प्रवास कालही एकत्र होता, आजही आहे आणि उद्याही असेल”
“आमचा प्रवास कालही एकत्र होता, आजही आहे आणि उद्याही आमचा प्रवास एकत्रच असेल. कारण आम्ही खुर्च्या तोडण्यासाठी, पदं मिळवण्यासाठी सरकार तयार केलेलं नाही, तर हे सरकार जनसामान्यांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे म्हणून तयार केलं आहे,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

 

जाहिरात वादावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
“एखाद्या जाहिरातीमुळे किंवा कुणाच्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये कुठे काही होईल इतकं तकलादू हे सरकार नाही. हे जुनं सरकार नाही. जुन्या सरकारमध्ये कुणी आधी भाषण करायचं आणि कुणी नंतर भाषण करायचं यावरून गच्ची पकडणारे आम्ही पाहिले. मात्र, हे सरकार सामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे,” असं म्हणत जाहिरात वादावर फडणवीसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Advertisement

Advertisement