नागपूर - भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आज नागपूरात दाखल होणार आहेत. ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तेलंगणा मॉडेलची माहिती देणार असून बीआरएसच्या पक्ष कार्यालयाचे देखील उद्घाटन करणार आहेत. दरम्यान, भाजपचा बालेकिल्ला तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात होणारी हा मेळावा आणि केसीआर यांच्या एन्ट्रीमुळे विशेष मानले जात आहे.
मराठवाड्यानंतर विदर्भात पाऊल
बीआरएसच्या विस्तारासाठी चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाऊल टाकले आहे. नांदेड येथे पक्षाचा मोठा मेळावा झाल्यानंतर विदर्भात पक्ष विस्तारासाठी प्रयत्न केले जात आहे. याकरिता बीआरएसचे पक्ष कार्यालय उघडण्यात येत आहे. वर्धा रोडवरील साई मंदिराजवळ, रामकृष्णनगर येथे हे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.
कार्यालय उद्घाटनानंतर मेळावा
दुपारी दीड वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपून ते थेट सुरेश भट सभागृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्याला विदर्भातील चार ते पाच हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचा दावा पक्षाच्या समन्वयकांकडून करण्यात आला आहे.
देशमुखांशी साधला होता संपर्क
बीआरएस पक्ष कार्यकर्त्यांच्या प्रवेशासाठी गेल्या काही महिन्यांपासून अनेक नेत्यांच्या संपर्कात आहे. माजी आमदार आशिष देशमुख यांच्याही बोलणीही केली होती. मात्र ते भाजपमध्ये जाणार आहेत. त्यामुळे बीआरएसने फक्त समन्वयकांच्या नियुक्त्या करून पक्षातील प्रमुख पदांचे अद्याप वाटप केलेले नाही.