जून महिन्यातील अर्धा महिना उलटला असताना अजूनही मराठवाड्यातील (Marathwada) अनेक भागात पावसाने (Rain) पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. अशातच शेतकऱ्यांना दिलास देणारी बातमी समोर आली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शनिवारी (17 जून) तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सोबत वादळी वारा देखील असणार आहे. हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे.
मराठवाड्यातील नांदेड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात शनिवारी तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसांत कमाल तापमानात तफावत जाणवणार नाही. मराठवाड्यात 16 ते 22 जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिल. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असा सल्ला वनामकृवि ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने दिला आहे.
शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष
खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, आता शेतकऱ्यांचे लक्ष आता पावसाकडे लागले आहेत. मात्र 7 जून उलटून देखील प्रतीक्षेत असलेला पाऊस काही पडताना दिसत नाही. त्यामुळे आता मराठवाड्यातील शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे विभागातील शेतीच्या मशागती देखील पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पाऊस पडताच पेरण्यांना सुरुवात होणार आहे. तर हवामान विभागाने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजानुसार आता शेतकऱ्यांचे देखील लक्ष त्याकडे लागले आहे.
पेरण्यांची घाई करु नका
दरम्यान मराठवाड्यात काही भागात दोन दिवसांपूर्वी तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी देखील सुरु केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या अशी कोणतीही घाई करु नये असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहेत. सोबतच योग्य पाऊस झाल्यावरच पेरण्या कराव्यात असे आवाहन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तुरळक पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी करणे योग्य राहणार नाही.
शेतकऱ्यांची फसवणूक
शेतकरी पावसाची आस लावून बसला असून, यासाठी शेतकरी बी-बियाणे खरेदी करत आहेत. दरम्यान याचा फायदा घेत अनेक ठिकाणी कृषी सेवा केंद्र चालकांकडून लुटमार करण्यात येत आहे. 853 रुपयांची कापसाच्या बियाणाची बॅग 1200 ते 2300 रुपयांपर्यंत विकली जात आहे. आधीच गेल्या वर्षी कापसाला भाव मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरात पडून आहे. त्यातच आता पुन्हा कापूस लावायचा म्हटल्यावर बियाण्यांपासूनच लुटमार सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.