संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी देहू येथून प्रस्थान झाले तर रविवारी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले मात्र यावेळी एक धक्कादायक घटना घडली असून वारकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचा प्रकार घडला आहे.
रविवारी संध्याकाळी चार वाजता आळंदी येथून माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढपूरच्या दिशेने प्रस्थान करण्यात आले. आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक श्री क्षेत्र आळंदीत जमले आहे.मात्र, या वारीला पहिल्याच दिवशी गालबोट लागल्याची घटना घडली आहे.रविवारी संध्याकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढपूरच्या दिशेने प्रस्थान होणार असतानाच, पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली.
माऊलींच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी वारकरी आग्रह धरत होते. पण याचवेळी पोलिसांनी वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी वारकऱ्यांनी पोलिस बंदोबस्तातील कर्मचारी आणि बॅरिकेट्स ढकलून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी पुन्हा पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. पण वारकरीही चांगलेच भडकले होते.
अशात पोलिसांनी काही वारकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. 47 दिंड्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा परवानगी देण्यात आली होती. यातील प्रत्येक दिंडीतील 75 वारकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश दिला जातो. परंतु यातील काही वारकऱ्यांना पोलिसांनी मंदिरात प्रवेश नाकारला. त्या वारकऱ्यांनी प्रवेश देण्याचा आग्रह केल्याने पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट झाली. या घटनेमुळे मंदिर परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होते. या प्रकारानंतर पोलिसांनीही मंदिरात बंदोबस्त वाढवला आहे.