पुणे: देशातील तब्बल ३१ कोटी नागरिकांना उच्च रक्तदाबाचा विकार आहे. त्याचवेळी देशातील मधुमेही रुग्णांची संख्या १० कोटीहून अधिक आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) संशोधनातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आयसीएमआर आणि इंडिया डायबेटिस (इंडिया बी) यांनी हे संशोधन केले असून, ते लॅन्सेट या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. हे संशोधन २००८ ते २०२० या कालावधीत करण्यात आले. त्यात २० वर्षे व त्यावरील वयोगटातील १ लाख १३ हजार ४३ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण देशातील ३१ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आले.
या संशोधनानुसार, देशातील मधुमेहपूर्व रूग्णांची संख्या १३ कोटी असून, २१ कोटी नागरिकांना उच्च कोलेस्टेरॉल तर १८ कोटी जणांना अतिउच्च कोलेस्टेरॉल आहे. स्थूलतेची समस्या २५ कोटी जणांना असून, ३५ कोटी जणांना उदराची स्थूलता आहे. चयापचयाशी निगडित असंसर्गजन्य आजार स्थूलता, उच्च रक्तदाब आणि डिस्लिपिडेमिया हे ग्रामीणपेक्षा शहरी भागांमध्ये जास्त आढळून आले. मधुमेहपूर्व रूग्णांचे प्रमाण मात्र, ग्रामीण भागात वाढू लागले आहे. मानवी विकास निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या राज्यांमध्ये मधुमेह ते मधुमेहपूर्व रूग्णांचे प्रमाण कमी आहे.
केरळ, पुद्दुचेरी, गोवा, सिक्कीम आणि पंजाबमध्ये चयापचयाशी निगडित विकारांचे प्रमाण इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. देशभरात शहरी भागात उच्च रक्तदाबाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. याला केवळ मध्य भारताचा अपवाद आहे. देशातील चयापचयाशी निगडित रुग्णांची संख्या आधी वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. त्यामुळे या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी राज्यनिहाय धोरण आखण्याची आवश्यकता आहे. असे घडल्यास या आजारांना रोखता येईल, असे संशोधनात नमूद केले आहे.
मागास राज्यांमध्ये मधुमेह वाढतोय
देशाच्या दक्षिण आणि उत्तर भागात मधुमेहाचे जास्त रूग्ण आढळले आहेत. विशेषत: शहरी भागात रूग्णसंख्या अधिक आहे. मध्य आणि ईशान्य भारतात मधुमेहाच्या रूग्णांची संख्या कमी आहे. विकसित राज्यांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या स्थिर पातळीवर आली असून, मागास राज्यांमध्ये आता मधुमेही वाढू लागले आहेत, असे निरीक्षणही संशोधनात नोंदवण्यात आले आहे.