पुरोगामी महाराष्ट्रात राजकारणातील सौहार्द केव्हाच संपविण्यात आला आहे, मात्र आता विरोधी पक्षातील नेत्यांना थेट धमक्या दिल्या जात असतील आणि धमक्या देणाऱ्या व्यक्तीचे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी संबंध असतील, तर महाराष्ट्र कोणत्या वळणावर येऊन पोहचला आहे? ज्या महाराष्ट्राने परमत सहिष्णुता जपली होती, अगदी जिव्हारी लागणारी टीका केल्यानंतरही जेथे टीकेचा आदर केला गेला , त्या महाराष्ट्रात शरद पवार काय किंवा संजय राऊत काय, यांना धमक्या येणे हे राज्यात सरकारचा धाक राहिलेला नाही, हेच दाखविणारे आहे. धमक्या देणाऱ्या लोकांमध्ये इतका माज येतो तरी कोठून ?
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी महाराष्ट्रात यावी यापेक्षा मोठी कायदा सुव्यवस्थेची चेष्ठा काय असावी लागते. शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, त्याहीपेक्षा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, देशाचे मंत्री राहिलेले आहेत. अशा व्यक्तीला कोणीतरी उठवळ , उपटसुम्भ धमकावतो, तुमचा दाभोलकर करू म्हणतो आणि वरती पुन्हा हे सारे हिंदुत्वाच्या जाज्व्ल्य(? ) भावनेतून होत आहे अशी मखलाशी देखील केली जाते . असे करणाऱ्या व्यक्तिचवे भाजपच्या बड्या नेत्यांसोबतचे फोटो देखील समोर आले आहेत, याचा अर्थ नेमका काय घ्यायचा ? म्हणजे या उपटसुम्भाला नेमके कोणाचे पाठबळ आहे ? सरकारी पक्षातील कोणीतरी त्या व्यक्तीला शरद पवार याना धमकी दे असे सांगितले असेल असे आमचे म्हणणे नाही, मात्र शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला देखील आपण धमकी देऊ शकतो, इतका माज आणि मस्ती एका सामान्य कार्यकर्त्यांमध्ये येते कोठून ? आओपन काहीही केले तरी आपल्याला वाचवायला पाठीराखे आहेत या समाजातूनच हे होत आहे का ? मध्यंतरी महाराष्ट्रात सत्तांतर होत असताना 'आपल्याला महाशक्तीचे आशीर्वाद आहेत ' असे सांगतानाच व्हीओडीओ व्हायरल झाला होता, मग आता वरिष्ठ नेत्यांना धमकावण्याचा हा माज देखील अशा कोणत्या 'महाशक्ती 'च्या बळावरच आहे का याची देखील चौकशी व्हायला हवी.
या[पूर्वी महाराष्ट्रात पुरोगामी विचाराच्या नेत्यांना जाणीवपूर्वक संपविण्यात आले. दाभोलकर असतील किंवा पानसरे असतील, त्यांच्या मारेकऱ्यांना अद्यापही शासन झालेले नाही. दाभोलकर किंवा पानसरे यांच ह्या झालेल्या हत्या या देखील दहशतवादाचाच प्रकार होता असेच म्हणावे लागेल. आम्ही म्हणतो, मांडतो, सांगतो तेच जगातले अंतिम सत्य , त्यापलीकडचे काही कोणी बोलायचे नाही असल्या अतिरेकी मानसिकतेतूनच हे प्रकार घडले होते, आता शरद पवार काय किंवा संजय राऊत काय, हे सरकारच्या विरोधात बोलतात, कथित हिंदुत्वाच्या ठेकेदारांच्या विरोधात बोलतात , म्हणून त्यांना संपविण्याच्या धमक्या देणे हा प्रकार देखील अतिरेकच, दहशतवादाचाच आहे आणि असली दहशत कोण पोसत आहे हे देखील राज्याच्या समोर यायला हवे.
सत्तेने संवेदनशील आणि सहिष्णू असावे लागते. सत्तेतल्या नेत्या कार्यकर्त्यांनी सहिष्णू वागले लागते, मात्र मागच्या काही काळात महाराष्ट्रातून सहिष्णुता हद्दपार होतेय का काय असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हे चित्र महाराष्ट्रासाठी, इथल्या समाजासाठी घातक आहे. प्रश्न केवळ शरद पवार किंवा संजय राऊत यांना आलेल्या धमक्यांचा नाही, तर असल्या प्रकारांमधून काळ सोकावणार आहे, तो सोकावू नये म्हणून असल्या मंजुऱ्या वृत्ती ठेचायला हव्यात.