Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - दंगलींच्या मुळाशी जायला हवं

प्रजापत्र | Thursday, 08/06/2023
बातमी शेअर करा

केवळ ज्यांचं हातावर पोट आहे त्यांनाच नव्हे तर मूठभर अपवाद वगळले तर कोणालाच दंगली नको असतात. बहुतांश समाज हा शांतताप्रिय असतो आणि दंगलींमुळे पोळलेला देखील असतो, तरीही मागच्या काही काळात महाराष्ट्रातील वातावरण बिघडविले जात आहे, आणि महाराष्ट्राला दंगलीच्या आगीवर बसविले जात आहे. हे सारे प्रकार निव्वळ तात्कालिक प्रतिक्रिया असूच शकत नाहीत. शांत असलेल्या महाराष्ट्रात नेमक्या दंगली कोणाला हव्या आहेत आणि या दंगलीतून कोणाची पोळी भाजणार आहे ? याच्या मुळापर्यंत जाण्याची हिम्मत शासकीय यंत्रणांनी दाखवावी आणि शासकीय यंत्रणा दाखविणार नसतील तर असल्या समाजकंटकांना आता समाजानेच उघडे पाडावे  . कारण यात होरपळणारे लोक सामान्यांच्या घरातले असतात आणि यात बरबाद होणारे तरुण देखील सामान्यांच्याच  घरातले असतात.
 

 

ज्या महाराष्ट्राचे आराध्य  दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्या महाराष्ट्रात औरंगजेबाचे समर्थन कोणीच करणार नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनतेच्या कल्याणाच्या विचारांनी पोसलेला आहे, त्या महाराष्ट्रात ज्यावेळी अचानकच अनेक ठिकाणी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारी काही टाळकी समोर येत असतील तर हा प्रकार निश्चितच कोणत्या तरी षडयंत्राचा भाग असतो. असले काही प्रकार कोणत्याच समाजाची भूमिका असूच शकत नाही, त्यामुळे हे जे काही घडविले जाते ते दंगली घडविण्यासाठीच असते हे उघड सत्य आहे. आणि महाराष्ट्रात आता त्याचेच पडसाद उमटत आहेत. नगर जिल्ह्यात काही घटना घडल्यानंतर कोल्हापुरात बंद पुकारला जातो आणि तेथील वातावरण कलुषित होत असेल तर कोणाला तरी महाराष्ट्रातील शांतता नको आहे हे उघड आहे. म्हणूनच हे कोणीतरी कोण आहेत हे सरकारने शोधले पाहिजे.
मागच्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सामाजिक वातावरण बिघडविण्याचे काम सातत्याने होत आहे. वेगवेगळ्या शहरात मागच्या काही दिवसांमध्ये ज्या घटना घडल्या ती एक प्रकारची विकृती आहे, आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने वातावरण अस्वस्थ ठेवायचे इतकेच या विकृतींना माहित आहे. म्हणूनच माथी भडकविण्याचे काम कोणीतरी करीत आहे हे तर स्पष्ट आहे. जय महाराष्ट्राने कायम सामाजिक एकोप्याचा विचार दिला तेथील तरुणाईला जाणीवपूर्वक भडकविण्याचे काम कोणी करीत असेल तर सरकारने हे रोखले पाहिजे. औरंगजेबाचे समर्थन किंवा उदात्तीकरण कोणालाच रुचणार नाही, अगदी कोणत्याच धर्माच्या सामान्य नागरिकांना हे रुचणार नाही हे स्पष्ट असताना केवळ औरंगजेबाचे फोटो झळकविणारे नाही, तर त्यांचे करविते धनी कोण आहेत हे शोधणे आवश्यक आहे.
जे दंगली घडविणारे लोक असतात, त्यांना समाजाच्या मानशास्त्राची चांगली जाण असते. काय केले की काय प्रतिक्रिया उमटतील आणि मग सामान्यांना त्यात कसे ओढत येईल याची ज्यांना जण आहे असली डोकी अशा प्रकारांमागे असतात हेच  दंगलींच्या घटनांमधून समोर आले आहे. अशा दंगलींचा वापर धार्मिक ध्रुवीकरण करून त्याचे रूपांतर मतांमध्ये करण्यात केला जातो हा देखील इतिहास आहे. त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी नेमके कोण महाराष्ट्राच्या सलोख्याला दंगलीच्या आगीत होरपळण्यासाठी सोडीत आहेत हे देखील समोर आले पाहिजे. विशेष म्हणजे राज्याच्या वेगवेगळ्या भागात अचानकच असे प्रकार होत असतील तर सरकारची गुप्तचर यंत्रणा काय झोप काढीत आहे का ? इतरवेळी छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याच्या हालचालींची माहिती सरकारला देणारी पोलिसांची ठिकठिकाणची विशेष शाखा या परिस्थितीमध्ये काय करीत आहे? त्यांना अशा घटना घडू शकतात याचा आगाऊ अंदाज का येत नाही आहे ? याचेही उत्तर समाजाला मिळायला हवे. दंगली भडकविणारी डोकी  मोजकीच  असतात , त्यांचे दंगलींनीं काहीच बिघडत नाही, मात्र यात होरपळतात सामान्य कुटुंब , एकदा का दंगलीच्या गुन्ह्यात अडकले की त्या तरुणाचे सारे आयुष्य करपून जाते हे सर्वानीच अनुभवलेले आहे. त्यामुळे तरुणाईनेही जे कोणी चुकीचे काही करतील त्यांना सरकार उत्तर देईल, उगीच उठसूट स्वतःच्या भावना भडकावून घेण्याची आवश्यकता नाही, कोणी औरंगजेबाचे उदात्तीकरण करीत असेल तर त्यांच्यासाठी कायदा आहे, मात्र असे कोणी केले म्हणून स्वतःच कायदा हातात घेण्याची आणि भडकावू पोस्ट किंवा गोष्टी व्हायरल करण्याची आवश्यकता नाही. अशावेळी या साऱ्या प्रकारामागे काय असू शकते याचा कार्यकारणभाव तपासण्याचा विवेक तरुणाईने दाखवावा . दंगली कोणाला हव्या आहेत हे सरकारी यंत्रणांनी शोधून काढावे नाहीतर समाजाने तरी त्यांना उघडे पाडावे . 

Advertisement

Advertisement