Advertisement

राज्य सरकारकडून फक्त जाहिरातबाजी, शेतकऱ्यांना मदत काही मिळेना

प्रजापत्र | Tuesday, 06/06/2023
बातमी शेअर करा

मुंबई - सरकारी जाहिराती या अत्यंत दिशाभूल करणाऱ्या, लोकांची फसवणूक करणाऱ्या आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेकडो कोटी रुपये खर्च करून खोट्या जाहिराती दाखवल्या जात आहेत, पण शेतकऱ्यांना काही मदत मिळत नाही, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला.

 

... तर राजकारण सोडेन - अजित पवार

शिंदे गटाने विरोधी पक्षनेते अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अर्थमंत्री असताना अजित पवार यांनी किती खोके जमवले ते सांगावे असे खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की,​​ एकाकडून जरी मी पैसे घेतले असतील तर राजकारण सोडून घरी बसेल, माझ्यावर आरोप करत असाल ते सिद्ध झाले नाही तर खासदार कृपाल तुमाने यांनी घरी बसायला हवे.

 

उद्धव ठाकरेंना टोला

मविआच्या वज्रमूठ सभा गेली काही दिवस झाल्या नाहीत, यावरून प्रश्न विचारला असता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. काही जण मुलांना घेऊन सुट्टीसाठी बाहेर गेलेत ते परत आले की तारखा ठरतील, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

 

काही महत्त्वाचे मुद्दे

अजित पवार म्हणाले की, काही प्रमुख अधिकारी म्हणतात की महत्त्वाचे पद नको आम्हाला वेगळी कामे करावी लागतात, हे असे आज पर्यंत कधी झाले नाही.
अजित पवार म्हणाले की, बदल्यासाठी पैसे घेतले जात असल्याचा आरोप होत असताना सरकारमधील कुणी त्यावर स्पष्टीकरण देत नाही.
पोलिस खात्यात राजकीय हस्तक्षेप कमी करण्याचे जर ठरवायला हवे. ठाण्यात तर भाजपचे नेते आणि कार्यकर्ते त्रासून गेले आहेत, असा दावा अजित पवारांनी केला आहे. कायदा सुवस्था चांगली राहावी हे सरकारचे काम आहे असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

 

वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुढे ढकलला

​​​​​​अजित पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती देताला सांगितले की,​ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम, दि. 9 जून 2023 रोजी, केडगाव, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे.

या बिपरजॉय चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक व प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच वेधशाळेच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन करून आपण वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम पुढे ढकलत आहोत, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

Advertisement

Advertisement