जळगाव - मला नाईलाजाने भाजप सोडचिठ्ठी द्यावी लागली. त्यानंतर राष्ट्रवादीने माझे राजकीय पुनर्वसन केले. आता मी भाजपात परत जाणार नाही. कर्नाटकात येदियुरप्पा, लिंगायत नेत्यांना डावल्यामुळे भाजपचा पराभव झाला. त्याचे चिंतन करुन सर्वांना एकत्र घेण्याची भूमिका दिसते. भाजप एक चांगला पक्ष आहे. पण काही व्यक्तींनी मला त्रास देण्याचा उडा उचललाय, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपचे जनरल सेक्रेटरी विनोद तावडे यांच्या आवाहनावर दिली आहे.
तावडे यांनी एका प्रसार माध्यमाशी बोलताना खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने भाजपात यावे, असे आवाहन केले होते. त्यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण आहे. त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा, असे विधान केले होते. भाजपात येण्याबाबत खडसे यांच्याशी किंवा पक्षश्रेष्ठींशी बोलणे झालेले नाही. त्यांना कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचेही तावडे यांनी म्हटले होते. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता खडसे म्हणाले, तावडे यांच्याशी फार जुनी मैत्री आहे.आम्ही सोबत काम केले आहे. त्यांनी मैत्रीपोटी हे आवाहन केलेले आहे.
खालच्या पातळीवर त्रास दिला जातोय...
चाळीस वर्षे भाजपाचा विस्तार करण्याचे काम केले.त्यावेळी सर्वजण डोक्यावर घेत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरच मी काय पक्षाला लांछनास्पद काम केले? त्या काळात माझ्यावर आरोप लावण्यात आले. इडी, सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशा मागे लावण्यात आल्या. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. मला पक्ष सोडायचा नव्हता. मला काही लोक पक्षातून ढकलताहेत असेही बोललो होतो. नाईलाजाने पक्ष सोडावा लागला. राज्याचा विरोधी पक्षनेता असताना माझ्या अधिकारात फडणवीस यांना विधीमंडळात बोलण्याची संधी दिली.
भाजप प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली. त्यांना राजकारणात मोठी मदत केली. अर्थात ते मोठे आहेतच. आजही माझे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत. अमीत शहा यांना दिल्लीत भेटलो होतो. राजनाथ सिंग यांचीही काही दिवसांपूर्वी भेट घेतली. मात्र,खालच्या पातळीवर मला त्रास देण्यात येतोय.
तर विजनवासात गेलो असतो...
भाजपात गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, माझ्यानंतर आता पंकजा मुंडे यांना त्रास दिला जात आहे. महाराष्ट्रात आता भाजपकडे दोन-चार मोठे नेते आहेत.बाकीचे संपवले आहेत.भाजपात असताना मी खूप त्रास सहन केला. त्यातून आता बाहेर पडलो आहे. पदावर नसलेल्या व्यक्तीपासून लोक दूर जातात. हे मी मंत्री असतानाही अनुभवले. राष्ट्रवादीने राजकीय पुनर्वसन केले.आमदार बनविले.पक्षाच्या कोअर कमिटीवर आहे.चांगला सन्मान मिळतोय. नाही तर मी विजनवासात गेलो असतो,असेही खडसे म्हणाले