बीड दि. २ (प्रतिनिधी ) : राज्यात महाविकास आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरु असली तरी आघाडीतील जागा वाटप तितकेसे सोपे असणार नाही असेच चित्र अनेक ठिकाणी आहे. सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या बीड मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेने जोरदार बांधणी सुरु केली असून नुकत्याच झालेल्या महाप्रबोधन यात्रेनंतर तर ठाकरे सैनिकांचा उत्साह अधिकच वाढला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे ग्रामीण भागातील दौरे वाढले असून ते सध्या विधानसभेच्या उमेदवारीचे प्रमुख दावेदार असल्याचे चित्र आहे.
बीड जिल्ह्यातील बीड मतदारसंघ हा पूर्वापार शिवसेनेचा राहिलेला आहे. येथून शिवसेनेला अनेकदा विधानसभेत संधी देखील मिळाली . या ठिकाणी राष्ट्रवादीचा कडवा विरोधक कायम शिवसेनाच राहिलेली आहे. आता शिवसेनेतील फुटीनंतरही ठाकरेंच्या सेनेबद्दल मतदारसंघात बऱ्यापैकी सहानुभूति असून महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्या सहानुभूतीला आणखीच बळ मिळाले आहे.
ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. आणि त्यांच्याबद्दल सामन्यांमध्ये आपुलकीची भावना आहे. म्हणूनच आता शिवसेना (उबाठा ) ने बीड मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. बीड मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असला तरी येथून शिवसेना (उबाठा ) निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट आहे. जागावाटपात काही बदल होतील असा प्रचंड विश्वास ठाकरेंच्या सैनिकांना आहे, त्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र शिवसेना (उबाठा ) ने सुरु केलेली मोर्चेबांधणी आणि जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे वाढते दौरे आणि गाठीभेटी उद्या राष्ट्रवादीच्या अडचणी वाढविणाऱ्या ठरणार आहेत.
बातमी शेअर करा