Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - भाजप लक्षात घेणार का ?

प्रजापत्र | Friday, 02/06/2023
बातमी शेअर करा

एका खासदाराला वाचविण्यासाठी भाजप देशभरातील महिलांचा अवमान करीत आहे. आतापर्यंत विरोधीपक्ष या मुद्द्यावरून टीका करीत होते, आता भाजपच्या खासदारांना देखील या प्रश्नाचे उत्तर देताना जड जात आहे. स्मृती इराणींसारख्या मंत्री भलेही या विषयावर गप्प बसतील , मात्र खा. प्रीतम मुंडेंसारखे अनेक खासदार संवेदनशील आहेत, आणि त्यांना या विषयावर व्यक्त व्हावे लागत आहे. ब्रिजभूषण शरण सिंह ही मोदी शहा जोडीची राजकीय अपरिहार्यता असेलही कदाचित, मात्र तो देशाची परिहार्यता ठरू शकत नाही. आता तरी याचा विचार भाजपने करावा.

 

मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कार्यकाळातील कामांची गौरव गाथा मांडायची आदेश पक्षाने सर्व खासदारांना दिले होते. त्यानुसार देशभरात ठिकठिकाणी भाजपच्या खासदारांनी पत्रकार परिषदांमधून त्यांना सरकारने सांगितलेली माहिती दिली. यात मोदी सरकार महिला सन्मानासाठी कसे काम करीत आहे, उज्वला सारख्या योजना असतील, बेटी बचाव बेटी पढाव चा कार्यक्रम असेल किंवा तिहेरी तलाक सारख्या मुद्द्यांवर भाजपने घेतलेली भूमिका असेल, हे सारे महिला सन्मानाचे काम सरकार करीत आहे, हे प्रत्येक खासदारांनी आवर्जून ठिकठिकाणी सांगितले. त्यामुळे साहजिकच माध्यमांमधून दिल्लीतील महिला खेळाडूंच्या आंदोलनाचा प्रश्न समोर येणे अपेक्षित होते, तसे प्रश्न ठाकठिकाणी आले आहेत, आणि बहुतांश ठिकाणी या प्रश्नांवर भाजपच्या खासदारांची गोची झाल्याचे चित्र आहे.
बीडच्या भाजपच्या खासदार असलेल्या डॉ. प्रीतम मुंडे या भाजमध्ये असल्या तरी काहीशा संवेदनशील आहेत . दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे जसे सामान्यांच्या अनेक प्रश्नांवर प्रसंगी पक्षाची भूमिका वेगळी असली, तरी जनतेची भूमिका घेऊन पुढे यायचे तेच  'मुंडेत्व ' दाखविण्याची हिम्मत खा. प्रीतम मुंडे यांनी दाखविली. खा. मुंडे यांनी महिला खेळाडूंच्या प्रश्नांवर जी भूमिका घेतली ती खऱ्याअर्थाने जनभावना आहे. त्यामुळे मुंडेंची भूमिका पक्षाला रुचेल आणि पचेल का नाही माहित नाही , मात्र सामान्यांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. त्यावरून या विषयावर जनतेच्या मनात काय भावना आहेत हे सरकारने लक्षात घेणे आवश्यक आहे.
जो अनुभव बीडचा आहे, तसाच काहीसा अनुभव देशभरातला आहे. भाजपच्या ज्या काही मूठभर लोकांकडे संवेदना आहेत आणि सामान्यांच्या प्रश्नांवर जनतेची भूमिका घेण्याची मानसिकता आहे, त्यांनी या प्रश्नावर 'खेळाडूंशी संवाद व्हायला हवा ' अशी भूमिका घेतली, बाकी अनेकांची अवस्था 'सहन ही होत नाही आणि सांगता ही येत नाही ' अशीच झाली आहे. एकीकडे मोदी सरकार ९ वर्षाच्या कार्यकाळातील कामांचे ढोल वाजवीत असतानाच महिला खेळाडूंच्या  बाबतीतली बोटचेपी भूमिका सरकारच्या अडचणी आज वाढवेल का नाही हे माहित नाही, मात्र सरकारच्या चेहऱ्यावर डाग लावणारी नक्कीच आहे. या साऱ्या प्रकरणाला इतके दिवस लोटल्यानंतरही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर चाकर शब्द बोलत नाहीत. देशभरात गोंधळ झाल्यानंतर आणि अनेक खासदारांची गोची झाल्यानंतर देशाचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आता जागे झाले आहेत आणि हे प्रकरण सरकार संवेदनशीलपणे हाताळतंय असे त्यांनी म्हटले आहे. ठाकूर काहीही म्हणत असले तरी या साऱ्या प्रकरणात सरकारकडे संवेदना आहेत हे कोठेच दिसलेले नाही आणि लोकांमध्ये चीड आहे ती याचीच. ज्या खेळाडूंना लोकांनी डोक्यावर घेतले होते त्या सचिन तेंडुलकर सारख्या व्यक्तीला देखील यातून टीकेचा धनी व्हावे लागत आहे यावरून या विषयावरचे जनमत लक्षात यायला हवे . मात्र आताही केवळ धर्मवीर म्हणून मिरविणाऱ्या आणि पाच सहा लोकसभा मतदारसंघात उपद्रव करू शकणाऱ्या खासदाराला धक्का लावायचाच नाही अशीच भूमिका सरकार घेणार असेल तर खाप  पंचायत , शेतकरी नेते, खुद्द राज ठाकरे आणि सामान्य माणूस यांच्यामनातला क्षोभ सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. 

Advertisement

Advertisement