काही दिवसांपूर्वी NCERT च्या पुस्तकातून चार्ल्स डार्विनचा थिअरी ऑफ इव्होल्युशन अर्थात उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वगळल्यामुळे मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यासंदर्भात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. देशभरातील शिक्षणसंस्थांमधून केंद्र सरकारकडे आपला निषेध व्यक्त करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा एनसीईआरटीनं मुलांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रम सुधारणा मोहिमेअंतर्गत दहावीच्या पुस्तकातून लोकशाहीसमोरील आव्हाने, राजकीय पक्ष, सत्तासंघर्ष आणि चळवळ यावरचे धडेच हद्दपार केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा यावरून देशभर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
नव्याने काय वगळलं NCERT ने?
NCERTने इयत्ता दहावीच्या पुस्तकातून विज्ञान आणि लोकशाही राजकारण अर्थात सायन्स आणि डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स पार्ट वन या विषयांमधून प्रत्येकी तीन ती धडे गाळले आहेत. यामध्ये सायन्स विषयातील पिरिऑडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, सोर्सेस ऑफ एनर्जी आणि सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ नॅच्युरल रिसोर्सेस हे तीन धडे वगळण्यात आले आहेत.डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स पार्ट वन विषयातून पॉप्युलर स्ट्रगल्स अँड मूव्हमेंट्स, पॉलिटिकल पार्टीज आणि चॅलेंजेस टू डेमॉक्रसी हे तीन धडे वगळले आहेत. एकीकडे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वगळल्यानंतर निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नसताना आता पुन्हा एकदा नव्याने NCERTच्या पुस्तकातून हे धडे वगळल्याने त्यावर शिक्षण आणि राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.