भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत आंदोलन केले. मात्र दिल्ली पोलिसांनी हे कुस्तीपटूंना जंतर मंतरवरून फरफटत नेले अन् आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. भारताच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर अवघ्या काही तासातच हा प्रकार घडल्याने देशभरातून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
आता या प्रकरणात जागतिक ऑलिम्पिक समितीने उडी घेतली असून दिल्ली पोलिसांनी पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीबद्दल कडक शब्दात फटकारले आहे. IOC ने आपल्या वक्तव्यात म्हटले की, 'भारतीय कुस्तीपटूंना मिळालेली वागणूक ही अत्यंत वाईट आणि हादरवणारी होती. कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची स्थानिक कायद्याच्या चौकटीत बसणारी निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी IOC मागणी केली.'
आयओसीने भारतीय कुस्ती महासंघावर कारवाई करण्याबाबत देखील वक्तव्य केले. 'जेव्हापासून कुस्तीपटूंनी आरोप केले आहेत तेव्हापासून आम्ही जागतिक कुस्ती संघटनेच्या संपर्कात आहोत. त्यांनी या प्रकरणाची दखल घेत पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणात आयओसीच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंतर्गत राहून जागतिक कुस्ती संघटनेच्या उचललेल्या प्रत्येक पावलाचे समर्थन करते.'