ज्या खेळाडूंनी विजय मिळविल्यानंतर त्यांच्या सोबत व्हिडीओ काढून त्यांच्या यशाचे श्रेय देखील स्वतः घेणारे सरकारमधले कोडगे लोक आज महिला खेळाडू आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात पदके गंगार्पण करीत असताना देखील गप्प आहेत. खेळाडू देशासाठी मिळविलेली पदके केवळ गंगार्पण करीत नाहीत, तर त्यामुळे देशातील न्यायाच्या , महिला संरक्षणाच्या भूमिकेचे देखील विसर्जन होत आहे. याठिकाणी बाहुबली खासदारांसमोर कोणालाच न्याय मिळणार नाही असाच संदेश जगभरात गेला आहे. आपण अल्पवयीन मुलींना देखील न्याय देऊ शकत नाही, याची खरेतर ५६ इंच छातीचा गाजावाजा करणाऱ्या सरकारला लाज वाटायला हवी, पण सरकार आपला कोडगेपणा सोडायला तयार नाही.
भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचा अध्यक्ष असलेल्या वादग्रस्त ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील कारवाईसाठी देशातील महिला खेळाडूंनी देशासाठी जिंकलेली पदके गंगार्पण करण्याचा निर्णय घेतला. ज्या महिला कुस्तीपटुंनी देशासाठी योगदान दिले , त्या जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप करतात , त्यातील एक खेळाडू तर अल्पवयीन असते, त्यावेळी खरेतर सरकारने खडबडून जागे व्हायला हवे होते. एक खेळाडू अल्पवयीन असल्याने बाळ लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमे यात लावायला हवी होती. यातील आरोपींच्या मुसक्या बांधायला हव्या होत्या. मात्र सरकार म्हणवणाऱ्या यंत्रणेने यापैकी काहीच केले नाही. त्या आरोपीविरुद्ध गुन्हा दखल करण्यासाठी देखील खेळाडूंना सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. न्यायालयाच्या दट्ट्याने कसाबसा गुन्हा दाखल झाला, मात्र आरोपीला अटक होत नाही. आरोपीच्या अटकेची मागणी करणाऱ्या देशाच्या लेकींवर अमानुष लाठीचार्ज केला जातो, आणि हे सर्व कशासाठी , तर आरोपी भाजपचा खासदार आहे म्हणून, आणि त्याचा उत्तरप्रदेशातील ५-६ मतदारसंघात 'उपद्रव ' आहे म्हणून. चर्चा अशीही आहे , कि या ब्रिजभूषण सिंहाचे भाजपमधील काही ब्द्ता नेत्यांसोबत व्यावसायिक संबंध आहेत. आणि म्हणून मग या एकाला वाचविण्यासाठी सध्या सारी सत्ता कामाला लागली आहे आणि त्यासाठी प्रसंगी देशाची इभ्रत देखील पणाला लावायला सरकार तयार आहे.
ज्यावेळी खेळाडू पदक जिंकून येतात , त्यावेळी सत्तेतले लोक त्यांच्यासोबत फोटो काढतात , व्हिडीओ काढतात, खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी काही पुरस्कार जाहीर करतात. दहा वर्षांपूर्वीपर्यंत हे यश आम्ही सत्तेवर आहोत म्हणून आहे असा दर्प कोणाच्या वागण्या बोलण्यातून येत नव्हता , मात्र मागच्या ९ वर्षात तो दर्प देखील सत्ताधाऱ्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या बोलण्यातून डोकावत आहेच. आता या खेळाडूंच्या विजयाचे श्रेय ज्यांनी घेतले, या खेळाडू म्हणजे देशाचा अभिमान आहेत असे ज्यांनी जाहीर केले, तेच लोक या अभिमानाच्या अब्रूला धक्का लावण्याचा आरोप आपल्यातल्याच एकावर आहे हे कळताच मुके, बहिरे आणि आंधळे बनून का बसले आहेत ? देशातील ख्यातनाम खेळाडूंवर जर निषेध म्हणून, न्यायाच्या मागणीसाठी पदके गंगेत अर्पण करण्याची वेळ आली असेल तर देशातील सामान्य माणसाची परिस्थिती काय असेल ? या खेळाडूंनी सत्तेच्या विरोधात लढायचे तरी किती ? या खेळाडूंना लाठीहल्ला सहन करावा लागला, उपेक्षा सहन करावी लागली, तरी ते संघर्ष सोडायला त्यात नाहीत. मात्र देशाचा अभिमान असलेल्या खेळाडूंवर अशी वेळ येते याची लाज मात्र सरकारला वाटत नाही. खेळाडूंनी गंगेत केवळ पदके अर्पण केली नाहीत, तर देशाच्या अब्रूची रक्षा देखील यासोबतच विसर्जित झाली आहे. या देशात सामान्यांना न्याय मिळेल या भावनेचे विसर्जन गंगा नदीत झाले आहे. आज सत्तेवर असलेले मोदी 'मुझे गंगा ने बुलाया है ' असे म्हणत गंगेकडे धाव घेत असतात , आता आज त्याच गंगेत न्यायाच्या मागणीचे विसर्जन होत असताना ते गप्प आहेत, म्हणजे कणखर म्हणवणाऱ्या सरकारवर एका आरोपीचा किती दबाव असू शकतो हेच यातून दिसत आहे.
भारतातील सरकारधार्जिणे खेळाडू जरी यावर बोलणार नसतील, एकीकडे देशाच्या लेकी न्यायासाठी संघर्ष करीत असताना खेळामुळेच भारतरत्न मिळालेले सचिन तेंडुलकर सारखे खेळाडू ब्रँड अम्बॅसेडर म्हणून मिरवीत असतील, आणि महिला खेळाडूंवरील अन्यायाबाबत चाकारशब्द देखील काढीत नसतील तरी आजच्या घटनेकडे जग पाहत आहे. ज्या देशात स्वतःच्या खेळाडू सुरक्षित नाहीत, त्या देशाची प्रतिमा जगात काय जात असेल ? त्यामुळे खरेतर सरकारच्या कोडगेपणामुळे देशाच्या प्रतिमेला देखील धक्का पोचत आहे आणि याला जबाबदार 'राष्ट्र प्रथम 'चे ढोल वाजवीत सत्तेवर आलेले सरकार आहे.