Advertisement

उशिरापर्यंत सुरु राहणारी दुकाने,आरोपींच्या अटकेकडेही दुर्लक्ष

प्रजापत्र | Thursday, 25/05/2023
बातमी शेअर करा

बीड दि.२५ (प्रतिनिधी)-बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाण्याचे वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांच्या कार्यकाळात नेकनूरमध्ये नियम धाब्यावर बसवून उशिरापर्यंत हॉटेल आणि धाबे सुरु आहेत,मात्र नेकनूर पोलीस त्यावर कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे नेकनूर पोलीस गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींच्या अटकेबाबत देखील गंभीर नसल्याचे चित्र असून या संदर्भाने आता वरिष्ठानीच मुस्तफा शेख यांना जाब विचारला आहे.  
     बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाणे मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तक्रारदारांच्या तक्रारी वेळेवर न घेणे,हरवलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस पैसे मागतअसल्याच्या गंभीर तक्रारी होत असतानाच आता पोलीस ठाणे हद्दीत उशिरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेल आणि दुकानांना देखील पोलिसांचीच अभय असल्याचे चित्र आहे. पोलीस ठाणे हद्दीत अनेक दुकाने, हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरु असतात, मात्र त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होत नाही असा आक्षेप आता केजच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनीच घेतला आहे. यासाठी त्यांनी नेकनूरच्या ठाणेदारांचा खुलासा मागविला आहे. त्यासोबतच नेकनूर पोलीस अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेसंदर्भात गंभीर नसून अटकेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका देखील ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नेकनूर पोलीस नेमके करतात तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे. 

 

अनेक तक्रारीनंतरही का आहे अभय ? 
नेकनूरचे वादग्रस्त ठाणेदार मुस्तफा शेख यांच्या कार्यपद्धतीच्या संदर्भाने वारंवार अनेक तक्रारी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आलेल्या आहेत. अनेक गुन्ह्यातील फिर्यादींना आपली तक्रार नोंदवली जावी यासाठी बीडला येऊन पोलीस अधीक्षकांना भेटावे लागले. इतरही अनेक प्रकरणात तक्रारी झाल्या. त्यांच्या कार्यकाळात अवैध धंदे आणि गोवंश तस्करीच्या प्रकरणात बाहेरच्या पथकांनी कारवाया केल्या. मात्र इतके सारे झाल्यानंतरही पोलीस अधीक्षकांकडून या ठाणेदारांना अभय का दिले जात आहे हा देखील सामान्यांना पडणारा प्रश्न आहे. 
 

Advertisement

Advertisement