मागच्या काही काळात देशभरातच धार्मिक आणि सामाजिक सौहार्दाला हरताळ फासणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटनांनमधील आरोपींवर एक नजर जरी टाकली तरी त्यातील आरोपी हे १९ ते ३० या वयोगटातील असल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. ज्या वयामध्ये तरुणाईने करिअरच्या मागे लागणे अपेक्षित आहे, त्या वयातील तरुणाईला धार्मिक विद्वेषाच्या अंगाराने बहकवण्याचे काम जाणीवपूर्वक होत आहे. समाजमाध्यमांमध्ये प्रक्षोभक पोस्ट पसरविणारा वयोगट देखील हाच आहे. त्यामुळेच तरुणाईचा जो सोयीस्कर गैरवापर केला जात आहे, त्याकडे समाजाने, पालकांनी आणि स्वतः तरुनानीने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.
अकोला शहरात ता.१३ मे रोजी अशाच तरुणांनी व्हायलर केलेल्या एका पोस्ट वरून दोन समाजात संघर्ष झाला. त्यातून एकाचा बळी गेला व अनेकांची वित्तीय हानी झाली. दोन समाजात दुरावा निर्माण करणाऱ्या अशा पोस्ट व्हायलर होत असल्याने पोलिसांचा सायबर विभाग सातत्याने सायबर पेट्रोलिंगमधून सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे.त्यातून अफवांवर विश्वास ठेवून सामाजिक व जातीय सलोखा बिगडविणारी व माथी भडकाविणारी पोस्ट व्हायलर करण्यात १९ ते ३० वयो गटातील तरूण अग्रेसर असल्याचे पोलिसांच्या पाहणीत आढळून आले आहे.
मागच्या काही काळात देशभरातच धार्मिक आणि सामाजिक वातावरण कसे बिघडेल याचेच प्रयत्न होत आहेत. अकोला दंगल असेल किंवा त्र्यंबकेश्वर येथील घटना, अशा काही घटनांच्या माध्यमातून समाजमन कायम अस्वस्थ होत आहे. या दंगलीच्या मागे मोठा कट असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, मात्र अजूनतरी पोलिसांनी हा कात नेमका कोणाचा हे उघड केलेले नाही. वर उल्लेख केलेल्या दंगली असतील किंवा आणखी कोणत्या घटना, समाजमाध्यमांमध्ये प्रक्षोभक पोस्ट टाकायच्या आणि त्या कशा पसरतील हे पाहायचे असे काही षडयंत्र जाणीवपूर्वक होताना दिसत आहे. समाजकंटकाद्वारे विविध मार्गाचा अवलंब करण्यात येवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे दृष्टीने सामाजिक व भावनिक गोष्टीला साद घालून निष्पाप तरुणाईच्या डोक्यात इतराबाबत द्वेष निर्माण करण्यात येतो. यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर अधिक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्याकडून प्रक्षोभक किंवा समाज मन दुखावले जातील अशा आशयाचे मत कोणत्याही सोशल माध्यमांतून दिले जाणार नाही यांची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे . तरुणाई ही प्रक्षोभकच असरे. ती कोणत्याही गोष्टीवर लवकर प्रतिक्रिया देते. त्यामुळे त्यांची माथी भडकविणे अधिक सोपे असते . त्यातच आपल्याकडे असलेली बेरोजगारी, रोजगाराच्या संपत असलेल्या संधी , रोजच्या जगण्या मारण्याच्या प्रश्नावर तरुणाईने विचार देखील करू नये यासाठी अस्मितांचे होणारे राजकारण या साऱ्या गोष्टींमुळे सध्या तरुणाईला जातीय, धार्मिक अस्मितांमध्ये अडकविण्याचा काम होत आहे.
ज्यावेळी स्फोटक, प्रक्षोभक पोस्ट व्हायरल केल्या जातात, त्यावेळी अनेकांना प्रकरणाचे गांभीर्य गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश प्रमाणात १९ ते ३० वयोगटातील तरुण मुलांचा समावेश आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झाल्यानंतर अशा मुलांना त्यांचे कृतीचा नंतर पश्चाताप होतो; परंतु तो पर्यंत वेळ निघून गेलली असते. त्यामुळे सोशल मीडियाचा जबाबद वापर करून तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट बनवू नये, अगर फॉरवर्ड करू नये, तसेच कोणत्याही पोस्टला प्रतिक्रिया देताना संयम बाळगावा, घाई घाईने प्रतिउत्तर देताना अपशब्दांचा वापर झाल्यास हा सुध्दा अपराध आहे.कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचे उद्देशाने बुध्दिपुरस्सर विशीष्ट उद्देशाने तोंडी किंवा लेखी शब्दांनी अगर चिन्हाद्वारे तसेच दृश्य देखाव्याद्वारे त्या वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि असे गुन्हे दाखल झाल्यानंतर आपोआपच रोजगाराच्या, नोकरीच्या संधी देखील हिरावला जातात. आज माथी भडकविणारे लोक उद्या मदतीला येत नाहीत. त्यामुळे तरुणाईला वेगळ्या वाटेने नेणारांपासून सावध होण्याची आवश्यकता आहे.