Advertisement

आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

प्रजापत्र | Wednesday, 24/05/2023
बातमी शेअर करा

मुंबई - माजी आमदार आशिष देशमुख यांना राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यावर वक्तव्य करणं चांगलंच भोवलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिस्तपालन समितीनं देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावत पक्षातून तात्पुरतं निलंबित केलं होतं. यानंतर त्यांनी पक्षाच्या नोटीसला प्रत्युत्तर दिले होते.

मात्र, एकीकडे देशमुख यांची भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांशी जवळीक वाढली असतानाच काँग्रेस पक्षानं त्यांच्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. देशमुख यांचं काँग्रेस पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

आशिष देशमुख(Ashish Deshmukh) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आऱोप करत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. तसेच ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, काँग्रेसपक्षाच्या शिस्तपालन समितीनं अखेर देशमुख यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला असून त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने हा निर्णय घेतला होता.

उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसमधून निलंबित माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरला होता. यानंतर देशमुख हे पुन्हा भाजपामध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान, देशमुख यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केल्यानंतर त्यांना आता ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement