ज्यावेळी सत्तेवर सुड घेणारे बसलेले असतात किंवा यंत्रणांचा गैरवापर करून दबावाचे राजकारण करणारांच्या हाती सत्ता असते , त्यावेळी सत्तेपुढे न झुकणारांना त्रास होणारच असतो. मग ते जयंत पाटील असोत व आणखी कोणी, जसजशा निवडणुका आणखी जवळ येतील तशी ईडीच्या कमला अधिक गती येईल. त्यामुळे आता प्रत्येकवेळी चौकशीच्या आणि अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यापेक्षा जनतेच्या दरबारातच यासाठी किती आक्रमकपणे जात येईल याचा विचार सर्वच राजकीय पक्षांनी करावा. जो सत्तेपुढे न झुकतं, अटकसत्राला न घाबरता समोर जातो, तो काय करू शकतो हे डीके शिवकुमार यांनी कर्नाटकात दाखवून दिले आहे.महाराष्ट्रात देखील विरोधीपक्षांनी तो कित्ता गिरवावा .
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. कदाचित वाचकांच्या हाती हा अंक येईपर्यंत त्यांना अटक देखील झालेली असेल किंवा योग्य वेळेची वाट पाहत आणि दबाव कायम ठेण्यासाठी ईडी त्यांना सोडून देखील देईल. ही चौकशी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली. आपल्या पक्षाच्या नेत्याच्या समर्थनात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उत्तराने समजू शकते, मात्र अशी आंदोलने केल्याने सरकारच्या आरोग्यावर फार काही परिणाम होईल अशी शक्यताच मुळात नाही. ज्यांना कसेही करून , भीती दाखवून , दबाव आणून विरोधी पक्ष संपवायचे आहेत, असे लोक ज्यावेळी सत्तेवर असतात, त्यावेळी त्यांना असल्या आंदोलनांचे काहीच वाटत नसते . उलट आज त्यांची भक्त मंडळी हा लढा कसा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे , तपस यंत्रणा कशा भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात काम करीत आहेत असले काही तरी तुणतुणे वाजवीत असतात . त्यामुळे जयंत पाटलांच्या प्रकरणात देखील यापेक्षा वेगळे काही होईल अशी सुतराम शक्यता नाही. याठिकाणी जयंत पाटील दोषी आहेत का नाहीत , हा विषयच नाही. सत्ताधाऱ्यांना जयंत पाटील यांना अडकवायचे आहे, हे महत्वाचे आहे . जयंत पाटीलच काय, जे जे कोणी सत्तेच्या विरोधात बोलत आहेत, सत्तेपुढे झुकायला तयार नाहीत, त्यांना कसे अडचणीत आणायचे यासाठीच तर हे सारे सुरु आहे. मुळात केंद्रातील मोदी सरकारचा सारा पायाच असे भीती दाखवून स्वतःचा पक्ष वाढविण्यावर आणि विरोधीपक्ष संपविण्यावर आहे. त्यामुळे जे कोणी सत्तेला जुमानणार नाहीत त्यांना आम्ही कसा त्रास देऊ शकतो हेच तर भाजपला दाखवून द्यायचे आहे. त्यामुळे आज चौकशीसाठी जयंत पाटील आहेत, उद्या आणखी कोणी असतील, कारण कसेही करून भाजपला विरोधीपक्षातील लोकांच्या मनामध्ये भीती आणि दहशत कायम ठेवायची आहे. त्यामुळे आता अशा काही प्रकरणानंतर निदर्शने आणि आंदोलन करून काहीच होणार नाही.
कर्नाटकात डीके शिवकुमार यांचा देखील सत्तेकडून असाच छळ झाला, त्यांना अटक करण्यात आली , त्यांच्या २३ वर्षीय कन्येचा छळ करण्यात आला. त्यांच्यावर दबाव टाकण्याचा हरप्रयत्न झाला, मात्र शिवकुमार बधले नाहीत. या कारवायांबद्दल काही बोलण्याऐवजी त्यांनी जनतेच्या दरबारात जाऊन भाजपवाले किती ढोंगी आहेत आणि सामान्यांच्या जगण्यामरण्याच्या प्रश्नावर त्यांचे कसे दुर्लक्ष आहे हे दाखविण्यात शक्ती खर्ची केली. सत्तेचा विरोध सहन करून आणि सर्व प्रकारच्या यातना सहन करून देखील सत्तेच्या मस्तवालपणाच्या विरोधात ठामपणे उभे राहता येते, हे शिवकुमार यांनी दाखविले आणि कर्नाटकातील जनतेने त्या शिवकुमार यांना साथ दिली. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील विरोधीपक्षांनी कोणत्या चौकशीच्या विरोधात काही बोलण्याऐवजी , या त्रास सामोरे जावे लागणारच आहे, हा त्रास सरळ सरळ भाजपचे मांडलिकत्व स्वीकारल्याशिवाय संपणार नाही, त्यामुळे मांडलिकत्व स्वीकारायचे नसेल, तर आपल्याला खूप काही भोगावे लागू शकते याची खूणगाठ मनाशी बांधून सत्तेच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात रान उठविण्यासाठी सज्ज व्हायला हवे. त्यासाठी जनतेच्या दरबारात जाणायची तयारी ठेवायला हवी. नेत्यांसाठी नव्हे, तर जनतेच्या प्रश्नावर, सामान्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात, सामान्य माणूस जो देशोधडीला लागत आहे, त्याचा आवाज म्हणून जनतेत जाणायची तयारी विरोधीपक्षांनी ठेवावी तरच यंत्रणांचा गैरवापर करून पक्षविस्तार आणि विरोधक संपवू पाहणाऱ्या मानसिकतेला धक्का देता येईल.