मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसशी (IL&FS) संबंधित गैरव्यवहारप्रकरणी त्यांची आज चौकशी होत आहे. या कंपनीने अनेकांना नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप केल्याप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान, जयंत पाटील यांचे नावही समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
दरम्यान, जयंत पाटील यांच्या ईडीचौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. कारवाईविरोधात राज्यभरात आंदोलन करण्याची घोषणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबई दाखल झाले आहेत. तर अन्य कार्यकर्ते इस्लामपूर, सांगली येथे ईडी आणि भाजप विरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत. जयंत पाटील यांना ईडीने बजावलेल्या समन्सविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.
नेमके प्रकरण काय?
ED च्या सूत्रांनी सांगितले की, IL&FS मध्ये कथित कर्ज घोटाळा आणि मनी लाँड्रिंगचे प्रकरण 2019 मध्ये उघडकीस आले होते. प्रथम स्थानिक स्तरावर तपास करण्यात आला, ज्यामध्ये सापडलेल्या तथ्यांच्या आधारे ईडीने 2019 मध्येच तपास सुरू केला. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने IL&FS समूहाच्या कंपन्या IRL, ITNL आणि या कंपन्यांमध्ये नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. IL&FS ने कोहिनूर CTNL ला कर्ज दिले होते आणि इक्विटी गुंतवणूक देखील केली होती. सीटीएनएलने कर्ज भरण्यात चूक केली आहे. राज ठाकरे हे देखील CTNL मध्ये भागीदार होते. मात्र, नंतर त्याचे शेअर्स विकून ते बाहेर पडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज ठाकरे यांनी त्याच वर्षी शेअर्स विकले जेव्हा IL&FS ने CTNL चे शेअर्स तोट्यात विकले. याच प्रकरणात जयंत पाटील यांचेही नाव समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे.
जयंत पाटील यांचे म्हणणे...
प्रकरणाबाबत जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मी IL&FS कडून कोणतेही कर्ज घेतले नव्हते. मी तपासात सहकार्य करेन.
जयंत पाटील यांनी आज ट्विट करून म्हटले आहे की, आज सकाळी 11 वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे. माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे कि कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे.
दोनदा बजावला समन्स
साधारण 10 दिवसांपूर्वी ईडीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना IL&FS प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, जयंत पाटील यांनी ईडीला पत्र लिहून 10 दिवसांची मुदत मागितली होती. त्यांनी कौटुंबिक विवाहसोहळ्याला जावे लागणार असल्याचा उल्लेख आपल्या पत्रात केला होता. त्यानंतर ईडीने जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा समन्स बजावला होता. त्यानुसार आज जयंत पाटील चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहतील. जयंत पाटील यांना चौकशीसाठी दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे.
ईडी कार्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेड्स टाकले आहेत. तसेच, ईडी कार्यालयाच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.