नवी दिल्ली: शेतकऱ्यांनी पुकारलेल्या मंगळवारच्या भारत बंदनंतर बुधवारी केंद्रानं पाठवलेला कायदा दुरुस्तीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावून लावला आहे. त्यानंतर आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. पुढील आंदोलनाची रणनिती ठरवण्यासाठी आज सिंधू बॉर्डरवर दुपारी 2 वाजता शेतकरी संघटनांच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. सिंधू बॉर्डरवर होणाऱ्या बैठकीत 40 शेतकरी संघटनांचे नेते सहभागी होणार आहे. या बैठकीत 12 आणि 14 डिसेंबरला केल्या जाणाऱ्या आंदोलनाची रणनिती ठरवण्यात येणार आहेत. दरम्यान, सरकारसोबत आज होणारी बैठकही रद्द करण्यात आली असून, पुढील चर्चेची तारिख अद्याप ठरलेली नाही.
आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न?
दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 15 वा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. विविध राजकीय पक्षांसह नामवंत खेळाडू, कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, हे आंदोलन कमकुवत करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप भारतीय किसान यूनियनचे नेते मंजित सिंह यांनी केलाय. पण देशभरातून हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर दिल्लीतील जनतेकडे पाठिंबा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.