बीड - शिवसेना-भाजपची युती कायम रहावी, ही युती अखंड टीकावी, असे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते, असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे.
गोपीनाथ मुंडेंना अभिवादन
संजय राऊत आज बीड दौऱ्यावर आहेत. गोपीनाथ गडावर जाऊन त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला, पंकजा मुंडेंबद्दल काही अपेक्षा व्यक्त केल्या तसेच भाजपवरही टीका केली.
शिवसेना व भाजप हे रक्ताचे भाऊ
संजय राऊत म्हणाले, शिवसेना व भाजपची युती कायम रहावी, असे गोपीनाथ मुंडे यांना कायम वाटत होते. जाहीर कार्यक्रमांमध्ये, खासगी बैठकांमध्ये मुंडे ही भूमिका सातत्याने मांडत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही गोपीनाथ मुंडेंचे घनिष्ठ नाते होते. गोपीनाथ मुंडे यांची बाळसाहेब ठाकरेंवर गाढ श्रद्धा होती. ठाकरे कुटुंबीयांशीही त्यांचे जवळचे नाते होते. शिवसेना व भाजप हे रक्ताचे भाऊ आहेत, अशी गोपीनाथ मुंडे यांची भावना होती.
भाजप आता बदलला
संजय राऊत म्हणाले, आम्ही जो भाजप पाहीला तो आता दिसत नाही. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचे नेतृत्व आम्ही पाहीले आहे आणि या दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखालील भाजप आम्ही पाहीला आहे. तेव्हाचा भाजप आणि आताचा भाजप यातील फरक स्पष्ट दिसतो.
पंकजा मुंडेंनी निर्भय बनावे
पंकजा मुंडेंच्या राजकारणावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडेंचा वारसा आहे. वारसा असू शकतो. मात्र, नेतृत्वाची बरोबरी कुणीच करू शकत नाही. गोपीनाथ मुंडे यांचीही बरोबरी कुणीच करू शकत नाही. मात्र, पंकजा मुंडे यांच्याकडून अपेक्षा आहेत. गोपीनाथ मुंडे ज्या निर्भयपणे वावरले, त्याच निर्भयपणे पंकजा मुंडे यांनी वावरावे. गोपीनाथ मुंडे यांनी अनेक कार्यकर्ते निर्माण केले. मुडेंसारख्या नेत्यांनी संघर्ष केला, त्यामुळेच आज भाजप जो काही आहे तो दिसतोय.