उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर नेतृत्वाचा निर्णय व्हायला भाजपला भलेही एक आठवडा लागला असेल, कर्नाटकात मात्र चार दिवस काँग्रेसचा निर्णय होत नाही म्हणून भाजपने ओरडायला सुरुवात केली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे सोनिया गांधी यांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटक काँग्रेसमधील पेच सुटला आहे. कर्नाटकात सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांच्यातील वाद मिटविण्यात काँग्रेसला यश आले आहे. त्यामुळे एक मोठा पेच संपला आहे. आता कर्नाटकात ऑपरेशन लोटस सारखे काही करणे भाजपला लगेच शक्य होईल अशी परिस्थिती नाही. तसेच राजस्थानप्रमाणे कर्नाटक अस्वस्थ देखील राहणार नाही.
खूप वर्षानंतर कर्नाटक विधानसभेत कांग्रेसने १३६ इतक्या मोठ्या जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळविले. ज्यावेळी सारे राजकीय विश्लेषक त्रिशंकू विधानसभा असेल असे सांगत होते आणि जेडीएसने निकालापूर्वीच सौदेबाजीला सुरुवात देखील केली होती, अशा वातावरणात काँग्रेसने मिळविलेला एकतर्फी विजय निश्चितच सर्वांच्या भुवया उंचावणारा होता. अर्थात या विजयामागे कर्नाटक काँग्रेसमधील दोन बड्या नेत्यांचा वाटा तितकाच महत्वाचा होता. सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघेही तोडीस तोड नेते असल्यानेच कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा निर्णय करणे काँग्रेस अवघड होते. बरे वेळेत निर्णय झाला नाही, तर भाजपसारखा पक्ष संधी साधून असणारच हे देखील पक्ष श्रेष्ठ ओळखून असल्यानेच अखेर स्वतः सोनिया गांधी यांनीच यात मध्यस्थी करून हा विषय मार्गी लावला आहे.
कर्नाटकात यापूर्वी मुख्यमंत्रीपद भूषविलेले सिद्धरामय्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत आणि प्रदेशाध्यक्ष असलेले शिवकुमार हे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारायला तयार झाले आहेत. खरेतर शिवकुमार यांनी ज्या पद्धतीने कर्नाटक काँग्रेसची खिंड लढविली, ते पाहता त्यांच्या मुख्यमंत्रीपदावरील दावेदारीला तसा खऱ्या अर्थाने अर्थ होता देखील, मात्र संघटनात्मक पातळीवर अग्रेसर असलेल्या शिवकुमार यांना विधिमंडळ पक्षात सर्वाधिक आमदार आपल्यासोबत घेता आले नाहीत,आणि यात सिद्धरामय्या काहीसे पुढे गेले.
कर्नाटक विधानसभेचे निकाल लागल्यापासून हे राज्य हातचे गेल्याने भाजपची अस्वस्थता लपून राहिली नव्हती. या राज्यात काँग्रेस नेतृत्वाचा निर्णय घेत नाही म्हणून ओरड करणारे भाजपवालेच होते आणि काँग्रेसने काही तरी निर्णय घ्यावा आणि यातून कोण अस्वस्थ आहे ते शोधावे असे भाजपचे मनसुबे लपून राहिलेले नव्हते. म्हणूनच काँग्रेससाठी अवघड असणारा हा निर्णय अखेर सोनिया गांधींनी घेतला. सिद्धरामय्या यांच्या माध्यमातून आता लिंगायत आणि वोक्कलिंगम समाज अधिक जवळ करतानाच शिवकुमार यांच्या माध्यमातून संघटनात्मक व्यक्ती सोबत ठेण्याची कसरत काँग्रेसने केली आहे. शिवकुमार हे मागच्या अनेक वर्षात पक्षाचे विश्वासू म्हणून समोर आलेले आहेत, आणि म्हणूनच यावेळी देखील त्यांचाच एका अर्थाने बळी दिला किंवा त्यांनाच त्याग करायला लावला असेही म्हणता येईल. शिवकुमार काहीही झाले तरी बंड करू शकत नाहीत हा विश्वास काँग्रेसला आहे, त्यातूनच हा निर्णय झाला आहे. यातून आता कर्नाटकचे राजस्थान होण्याची शक्यता राहिलेली नाही. खुद्द सोनियानींच शिवकुमार यांची समजूत काढल्याने आता कर्नाटकातील वाद संपतील असे चित्र आहे. त्यामुळे एका मोठ्या पेचामधून काँग्रेस पक्षाने स्वतःची सुटका करून घेतली असून कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता वाढून आपला फायदा होईल या स्वप्नांमध्ये वावरणाऱ्या भाजपचा भ्रमनिरास नक्कीच झाला असेल.