तुळजाभवानी - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर (Shri Tuljabhavani Temple) व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे मंदिरात वेस्टर्न कपडे (Western Dress) घालणाऱ्यांना नो एन्ट्री अर्थात प्रवेश बंदी असणार आहे. आई तुळजाभवानी मंदिरात यापुढे हाफ पॅन्ट, बर्मुडा असे वेस्टर्न कपडे घालणाऱ्या भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थांचेवतीने अशा सूचनांचे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना मात्र जारी करण्यात आली नाही.
अंग प्रदर्शक, उत्तेजक ,असभ्य किंवा अश्लील वस्त्रधारी तसंच हाफ पॅन्ट बर्मुडा धारकांना मंदिरात प्रवेश नाही असा उल्लेख या सूचना फलकावर करण्यात आला आहे. कृपया भारतीय संस्कृती (Indian Culture) आणि सभ्यतेचे भान ठेवा अशी विनंती ही या फलकाद्वारे मंदिर संस्थांच्या वतीने भाविकांना करण्यात आलीय.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी
तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती म्हणून प्रसिद्ध आहे.