गेवराई - टेंडरच्या नावाखाली विनापावती अवैध वाळू उपसा करून तिची वाहतूक होत असल्याची माहिती गेवराईचे तहसीलदार सचीन खाडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सावळेश्वर शिवारातून एक तर गढी जवळून एक असे दोन हायवा पकडून ते तहसील कार्यालयात लावले. ही कारवाई आज पहाटे साडेचारच्या दरम्यान करण्यात आली.
गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी नदी पात्रात उतरून अवैध वाळू साठ्यावर कारवाई केली. त्यानंतर तेथील प्रशासन खडबडून जागे झाले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी महसूलच्या पथकाने गेवराईत वाळू माफियावर छापा मारून ट्रॅक्टर, केनीसह मोठ्या प्रमाणात वाळुचा साठा जप्त केला होता. आज सकाळी टेंडरच्या नावाखाली विनापावती अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सचीन खाडे यांना मिळाली. त्यांनी सावळेश्वर शिवार आणि गढी परिसरातून दोन हायवा ताब्यात घेतले. ही करावाई तहसीलदार सचीन खाडे, नायब तहसीलदार जाधवर, नामदेव खेडकर, जितेंद्र लेंडाळ, परमेश्वर सानप, परमेश्वर काळे, गोविंद ढाकणे, किरण दांडगे, बाळासाहेब पखाले, श्रीकृष्ण चव्हाण, शुभम गायकवाड, विकास ससाणे, बाबा बडे यांनी केली.