Advertisement

बीडच्या पालकमंत्री पदाची अवस्था ' कावळ्याच्या हातात दिला कारभार अन ... ' सारखी

प्रजापत्र | Saturday, 13/05/2023
बातमी शेअर करा

बीड दि. १२ (प्रतिनिधी ) : बिडाच्या पालकमंत्र्यांच्या हस्तकांमार्फत टक्केवारी मागण्याच्या प्रकारांचा जाहीर पाढा खुद्द भाजपच्याच  लोकप्रतिनिधींनी वाचला होता , त्यानंतर आता त्यांच्या नावर भाजपचे कार्यकर्ते कार्यालयामध्ये दादागिरी करतात अशी तक्रार खुद्द मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील  शेतकरी , सामान्य माणूस अडचणीत असताना पालकमंत्री असलेले अतुल सावे काहीच करीत नाहीत, मात्र निधीचे पविषय आले की त्यांच्या नावाने जिल्ह्यात बाजार उठतो असेच चित्र मागच्या काही महिन्यात पाहायला मिळत आहे.  त्यामुळे आजघडीला बीड जिल्ह्याची अवस्था 'कावळ्याच्या हाती दिला कारभार , आणि त्याने घाण केला दरबार ' अशी झाली असल्याच्या चर्चा लोक करीत आहेत.
बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्रे अतुल सावे यांच्याकडे दिल्यापासून जिल्ह्याची अवस्था 'असुनी नाथ मी अनाथ ' अशीच झाली आहे. पालकमंत्री जिल्ह्यात फारसे कधी फिरकत नाहीत. येतात ते त्यांचे हस्तक म्हणविणारे चार दोन कार्यकर्ते , स्वीय सहायक . बरे ते येतात ते काही जनतेच्या समस्या ऐकायला नाही, तर त्यांच्याकडे असते यादी पालकमंत्र्यांनी केलेल्या शिफारशीची., आणि या यादीत नाव यायला 'टक्का ' मोजावा लागतो असा आरोप खुद्द भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर्गत बैठकांमध्ये जाहीरपणे केलेला आहे. आता तर त्य्यांचे हस्तक चक्क अधिकाऱ्यांना दमदाटी करू लागल्याचे चित्र आहे.
मुळातच बीड जिल्ह्याला बाहेरचा पालकमंत्री पहिल्यांदा आलाय असेही नाही. यापूर्वी दिग्विजय खानविलकर, विक्रमसिंह पाटणकर , बबनराव पाचपुते असे अनेक पालकमंत्री  बाहेरचे होते. ते देखील जिल्ह्यातील राजकारणात फारसा हस्तक्षेप  करायचे नाहीत. त्यांच्या काळात निधी वाटपावरून किरकोळ कूरबुरी व्हायच्या , मात्र त्यांनी निधी विकला अशी जाहीर चर्चा कधी झाली नाही. त्या चर्चा आता नाक्यानाक्यावर होत आहेत. बीड जिल्ह्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले , त्यांचे अश्रू पुसायला पालकमंत्री सावे आले नाहीत , दलित अत्याचाराच्या घटना घडल्या , प्रशासनाच्या विरोधात उपोषन करून काहींनी जीव सोडला मात्र कशाचेच सोयरसुतक अतुल सावे यांना असल्याचे जाणवत नाही. त्यामुळे मग पालकमंत्री नेमके आहेत तरी कशासाठी असा सवाल सामान्यांना पडला आहे.

Advertisement

Advertisement