सांगलीमध्ये रविवारी झालेल्या नीट परीक्षेच्या काळात एका परीक्षा केंद्रात विद्यार्थिनींना त्यांचे कपडे आणि अंतर वस्त्र उलटे परिधान करायला सांगून परीक्षा द्यायला लावण्याचा प्रकार घडला. जागृत पालकांनी हा प्रकार समोर आणल्यानंतर राज्यभरातून तीव्र संतापाची लाट पसरली आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना दोन दिवसांत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Breaking Marathi News)
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, देशभरात एकाच वेळी झालेल्या नीट परीक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची अत्यंत चुकीची तपासणी केल्याच्या घटना देशभरात घडल्याचे माध्यमांनी समोर आणली आहे.
आपल्या राज्यात सांगलीत विद्यार्थिनीला कपडे उलटे घालायला लावणे, अंतर्वस्त्र तपासणं अशा तक्रारी आल्या आहेत. ही परीक्षा संपूर्ण राज्यात अनेक केंद्रांवर घेतली गेली. अनेक केंद्रांवर काय झाले आहे याची माहिती घेणे आवश्यक आहे असल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केलं आहे.
रूपाली चाकणकर पुढे म्हणाल्या कि, परीक्षेच्या वेळी कॉपी होऊ नये म्हणून काळजी घेत असताना विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होईल अशी तपासणी करणं अतिशय चुकीचं असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. अशी तपासणी करण्याच्या सूचना कोणी दिल्या? असे अधिकार त्या अधिकाऱ्यांना आहेत का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे असेही चाकणकर यांनी म्हंटलं आहे.
याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभरातील प्रकारांची चौकशी करणे गरजेचं आहे. राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे रुपाली चाकणकर यांनी नमूद केलं आहे.