Advertisement

सुट्ट्या असताना शाळेला सील लावले, पण गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ

प्रजापत्र | Sunday, 07/05/2023
बातमी शेअर करा

बीड : कोठेही परवानगीशिवाय शाळा सुरु असेल तर त्या शाळा बंद करतानाच त्या शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश असतानाही शिक्षण विभाग 'नारायणा ' स्कुलच्या विरोधात असे पाऊल उचलायला तयार नसल्याचे चित्र आहे. मोठी कारवाई केल्याच्या आविर्भावात शिक्षण विभागाने सुट्ट्यांच्या काळात शाळेला सील ठोकले मात्र शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध कसलीही कारवाई केली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे 'नारायणा'वरचे प्रेम कमी होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

बीड जिल्ह्यातील बोगस शाळांवर कारवाई करावी अशी मागगनी सातत्याने होत आहे. मात्र शिक्षण विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना आढळून आले आहेत. शहरात सुरु असलेल्या 'नारायणा ' शाळेवर तर येथील अधिकाऱ्यांचे असलेले विशेष प्रेम चर्चेचा विषय ठरले. या शाळेच्या संदर्भाने अधिकाऱ्यांनी अगदी वरिष्ठांना देखील दिशाभूल करणारी माहिती दिली. मात्र सर्वच संस्थाचालकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता शिक्षण विभागाने या शाळेला सील ठोकून मोठी कारवाई केल्याचा आव आणला आहे. मात्र सध्या शाळेला सुट्ट्या आहेत आणि शाळा  व्यवस्थापन पालकांना 'प्रवेश संपल्याचे ' भासवीत आहे.अशावेळी शाळेला सील ठोकून काय सध्या होणार हा प्रश्न आहेच. शिक्षण विभागाच्या अधिकार्यां खरोखर कारवाई करून ठोस संदेश द्यायचा होता तर 'नारायणा 'च्या व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हा का दाखल होत नाही हा प्रश्न आहे. मात्र त्याचे उत्तर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी द्यायला तयार नाहीत.
 

Advertisement

Advertisement