Advertisement

हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू

प्रजापत्र | Saturday, 06/05/2023
बातमी शेअर करा

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने कोकणातील राजकारण तापलं आहे. दरम्यान, बारसू रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसूच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचंरत्नागिरीत आगमन झाल्यापासून ठिकठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत झालं. तसेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. दरम्यान, यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे.

 

उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीमध्ये आल्यानंतर उपस्थितांशी थोडक्यात संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी प्रकल्पासाठी पत्र लिहिलं होतं. मात्र लोकांवर जबरदस्ती करून प्रकल्प करा असं मी म्हटलं नव्हतं. हुकूमशाहीच्या माध्यमातून हा प्रकल्प लादू नका. राज्य सरकारने हुकूमशाही करून हा रिफायनरी प्रकल्प येथे लादण्याचा प्रयत्न केला. तर  आम्ही महाराष्ट्र पेटवू. आज मी इथे येऊन उभा आहे. आता जे या प्रकल्पाचं समर्थन करत आहेत. त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त बाजूला ठेवून समोर या आणि रिफायनरीचं समर्थन करून दाखवावं, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं. विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. महाराष्ट्राच्या वाट्याला राख आणि गुजरातच्या वाट्याला रांगोळी, असं होता कामा नये अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

 

तसेच उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्यादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बारसू येथील सड्यावर असलेल्या कातळशिल्पांचीही पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, जसं मी या प्रकल्पाबाबत पत्र दिलं होतं. तसंच पत्र मी या कातळशिल्पाबाबतही दिलं होतं. या कातळशिल्पांचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा अशी मागणी मी केली होती.  या कातळशिल्पांबाबत मला माहिती होती. मात्र या रिफायनरीच्या जागेत ही कातळशिल्प येतात हे मला हल्लीच समजलं. हा अमूल्य ठेवा आहे. त्याचं जतन व्हायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

दरम्यान, बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी विरोधातील आंदोलन चार पाच दिवस स्थगित होते. मात्र ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त कालपासूनच बारसूच्या सड्यावर ग्रामस्थ जमले आहेत. ठाकरे गटाच्या पाठिंब्यामुळे पुन्हा नव्याने आंदोलन सुरु होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर दुसरीकडे प्रकल्प समर्थकही राजापुरात एकवटणार आहेत. ठाकरे प्रकल्पविरोधकांना भेटण्यासाठी येत असले तरी त्यांची भेट घेण्याची व आपल्या भावना त्यांच्यासमोर मांडण्याची तयारी प्रकल्प समर्थकांनी केली आहे.  

Advertisement

Advertisement