शरद पवार यांच्याबद्दल 'अनप्रिडीक्टेबल ' हा शब्द जसा राजकारणात रूढ झालेला आहे , तसेच शरद पवार हे धक्कातंत्रासाठी देखील प्रसिद्ध आहेत. 'लोक माझे सांगाती' च्या प्रकाशनाच्या निमित्ताने अचानक राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याची शरद पवारांची घोषणा ही त्याच धक्कातंत्राचा एक भाग होती असेच आता म्हणावे लागेल. यातून शरद पवारांनी राष्ट्रवादीमधील आपले स्थान काय आहे हेच सर्वांना पुन्हा दाखवून दिले आहे. अन्यथा पवार आणि निवृत्ती हे समीकरण कधी जुळूच शकत नाही.
शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती ' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने शरद पवारांनी ' राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याची ' केलेली घोषणा अपेक्षेप्रमाणेच राष्ट्रवादीमध्ये भूकंप निर्माण करणारी होती. शरद पवार असे काही बोलणार याची कल्पना भलेही प्रतिभा पवार आणि अजित पवार व सुप्रिया सुळेंना असेलच, मात्र राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांसाठी हा मोठा धक्का होता. याच्या काय प्रतिक्रिया उमटणार हे शरद पवारांना माहित नव्हते असेही नाही , त्यामुळेच कार्यकर्ते संतप्त होऊन प्रतिक्रिया देत असताना शरद पवार मात्र ठाम होते, आणि अखेर काही तासांच्या गोंधळानंतर 'आपण या निर्णयाचा फेर विचार करू ' असे बोलून शरद पवार मोकळे झाले आहेत.
मात्र हे सारे वाटते तितके सोपे नाही. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी 'भाकरी फिरवावी लागेल ' असे सूचित केले होते. ही भाकरी फिरवायची म्हणजे काय तर राष्ट्रवादीमधील अनेक सरंजामदारांना धक्के द्यायचे. मात्र ही प्रक्रिया तितकीशी सोपी नक्कीच नव्हती. त्यामुळेच त्यांनी स्वतःपासूनच सुरुवात केली. पवारांचे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर नसणे अजित पवारांना भलेही चालणार असेल, पण पक्षातील इतरांना ते रुचणार नव्हते आणि शरद पवारांना देखील हेच सर्वांना दाखवून द्यायचे असावे. मागच्या काही काळात अजित पवार बंड करणार का ? भाजपसोबत जाणार का? अजित पवारांसोबत किती लोक आहेत? राष्ट्रवादीचे भविष्यातील नेतृत्व सुप्रिया सुळे का अजित पवार ? या सर्व चर्चा ज्या होत होत्या, त्या सर्वांना देखील 'राष्ट्रवादी शरद पवारांनीच ' हेच शरद पवारांना दाखवून द्यायचे होते. ग्रामीण भाषेत ज्याला 'हलवून खुंटा बळकट करणे ' म्हणतात, तसेच काहीसे शरद पवारांनी केले. शरद पवारांसमोर 'त्यांच्या निर्णयाचा आदर राखा ' असे सांगू पाहणाऱ्या अजित पवारांना देखील कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडावरच रोखले. राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते देखील यात सहभागी होते. त्यामुळे आज तरी शरद पवारांना वगळून राष्ट्रवादीचा विचार करता येणार नाही हे शरद पवारांनी दाखवून दिले आहे.
पवारांचे हे सारे धक्कातंत्र जसे अजित पवारांसारख्या 'कोठेही जायला तयार ' असलेल्या नेत्यांसाठी होते तसेच भाजपने राष्ट्रवादीमधील कोणालाही डोळे मारून उपयोग होणार नाही हे सांगणारे देखील होते. एका घोषणेतून शरद पवारांनी अनेकांना धक्के दिले. अनेकांना पक्षातील स्वतःचे आणि इतरांचे स्थान देखील दाखविले. आता काही दिवसांनी , म्हणजे २-३ दिवसांनी शरद पवार 'लोकमताचा आदर करत ' आपला निर्णय मागे घेतील, अजित पवारांना वाटते तसे 'शरद पवारांच्या समोरच नवीन अध्यक्षाने तयार व्हावे ' यासाठी एखादा कार्याध्यक्ष निवडला जाईलही कदाचित , पण आपली पक्षावरची मांड अजूनही पक्की आहे आणि त्यात काही बदल होणार नाही, हे मात्र शरद पवारांनी दाखवून दिले आहे.