बीड दि. २ (प्रतिनिधी ) : गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरतीदरम्यान प्रकल्पग्रस्तांचे बोगस प्रमाणपत्र देणारे रॅकेट समोर आले असून यात बीडच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र बीडमध्ये तीन वर्षांपूर्वीच बोगस प्रमाणप्तर घोटाळ्याच्या तक्रारी झाल्या होत्या आणि खुद्द एसीबीने या घोटाळ्याच्या चौकशीची परवानगी मागितली होती, मात्र तत्कालीन अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात कारवाईच केली नाही. त्यामुळे या साऱ्या घोटाळ्यावर महसूल विभागच पांघरून घालत आला आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरतीदरम्यान बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखल करण्याचा प्रकार समोर आला होता. यात बीडचे कनेक्शन समोर आले आहे. पोलिसांनी दोघांना अटक देखील केली आहे. आता यातून बीडमधील बोगस प्रमाणपत्रे देणारे रॅकेट समोर येणार का हा प्रश्न आहेच.बीड जिल्ह्यात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांमधील गोंधळ हा काही आजचा नाही. या[पूर्वी देखील बीड जिल्ह्यात प्रकल्पग्रस्त प्रमाणप्तर देण्यात सावकला गोंधळ असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तुकडेबंदी कायद्याचा विचार न करता प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे देण्यात येतात आणि बोगसगिरी होते अशी तक्रार अनिल पाटील यांनी केली होती. अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर असदर तक्रार एसीबीकडे वर्ग करण्यात आली होती. त्यावरून एसीबीने बीडच्या प्रशासनाला या प्रकरणाच्या चौकशीची परवानगी देखील मागितली होती. मात्र त्यावर जिल्हा प्रशासनाने काहीच भूमिका घेतली नाही. सदर तक्रारीत जिल्ह्यातून तब्बल ५० हजतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे वितरित झाल्याचा दावा देखील करण्यात आला होता.
चार वर्षांपूर्वी १८ प्रमाणपत्रे करण्यात आली होती रद्द
दरम्यान वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात नोकरी मिळविण्यासाठी दाखल केलेली तब्बल १८ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे तत्कालीन उपजिल्हाधिकारी सामान्य यांनी २०१९ मध्ये रद्द केली होती. मात्र या प्रकरणाच्या खोलात जाण्याची आवश्यकता त्यावेळी देखील जिल्हा प्रशासनाला वाटली नव्हती.