प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिकमध्ये दाखल मारहाणीच्या गुन्ह्यात झालेल्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नाशिकमध्ये सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना 5 हजारांचा दंड आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, नाशिकमधील या प्रकरणात उच्च न्यायालयाने बच्चू कडू यांना दिलासा देत झालेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
बच्चू कडू यांनी 2017 ला दिव्यांगांच्या मागण्यांसाठी नाशिकच्या महापालिकेत आंदोलन केलं होतं. यावेळी बच्चू कडू यांनी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली होती. या प्रकरणामध्ये बच्चू कडू यांना नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.