राज्यासह मराठवाड्यावर भर उन्हाळ्यात अवकाळीचे काळे ढग पुन्हा घोंगावत आहेत. आजपासून 30 एप्रिलपर्यंत मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुसळधार पावसासह काही भागांमध्ये गारपीटीचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यात वादळी पावसासह गारपीटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तापमानात चढउतार
राज्यात उन्हाचा चटका वाढला असून अकोला, चंद्रपूर, सोलापुरात तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. कोकण वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान आहे. यातच मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
यातच पावसाच्या आणि गारपीटीच्या इशाऱ्यामुळे कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा शक्यता कायम हवामान विभागाने वर्तविली आहे.
कोणत्या जिल्ह्यात पाऊस?
27 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल.
मराठवाड्यात विविध भागात पावसाने हजेरी लावल्यानंतर मध्य महाराष्ट्रासह नाशिक, नगर, पुणे तर मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्याला गारपीट आणि वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.