राहुल गांधी यांच्या सरकारी बंगल्यातील अखेरचं सामान हलवण्यात आलं. 19 वर्षे जिथे राहिले, तो तुघलक लेन येथील बंगला आज अखेर त्यांनी सोडला. या प्रसंगी राहुल गांधी भावूक झाले होते. यावेळी सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, तसेच प्रियंका गांधी यादेखील उपस्थित होत्या. देशातल्या जनतेनं मला हे घर दिलं होतं. गेल्या 19 वर्षांपासून मी इथे राहतोय. मात्र केंद्र सरकारने हा बंगला माझ्याकडून हिसकावून घेतला. असं असलं तरीही मी सरकारविरोधात सत्य बोलतच राहिन, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला. तर हे सत्य बोलण्यासाठी जी किंमत चुकवावी लागेल, ती चुकवण्यासाठी मी तयार आहे, असं वक्तव्यही राहुल गांधी यांनी केलंय. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे त्यांना हा सरकारी बंगला सोडावा लागला.
सच्चाई बोलने की कीमत है आज कल!
वो जो भी कीमत होगी, मैं चुकाता जाऊंगा। pic.twitter.com/1ZN6rbGFIu— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 22, 2023
नवी दिल्ली येथील 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यातील सामान गेल्या काही दिवसांपासून शिफ्ट करण्याचं काम सुरु होतं. आज राहुल गांधी यांनी या घराचा निरोप घेतला. सरकारी अधिकाऱ्यांना या घराच्या चाब्या त्यांनी सुपूर्द केल्या. यावेळी प्रियंका गांधी, सोनिया गांधीदेखील उपस्थित होत्या. अशा कारवायांनी आम्ही घाबरणार नाहीत. आम्ही मुद्द्यांवर भाष्य करतच राहूत, असा इशारा त्यांनी दिलाय.
या घराचा निरोप घेताना राहुल गांधी यांनी तेथील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हस्तांदोलन केलं. नंतर दरवाज्याला कुलूप लावून सरकारी अधिकाऱ्यांच्या हाती चाब्या दिल्या. माझं घर हिसकावून घेतलं जातंय, असं यावेळी राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींसोबत उपस्थित असलेल्या प्रियंका गांधी यांनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी सत्य बोलले, त्यामुळे हे सगळं घडतंय. पण ते डगमगणार नाहीत. त्यांच्याकडे हिंमत आहे. ते घाबरणार नाहीत. आपला संघर्ष सुरुच ठेवणार, असं वक्तव्य प्रियंका गांधी यांनी केलंय.