भूम दि. 21 - राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील भूम ग्रामीण रूग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांनी आरोग्य कर्मचार्यांना मारहाण व शिवीगाळ करून रूग्णालयातील विविध साहित्यांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे मागील दोन दिवसांपासून कर्मचारी दहशतीखाली काम करीत असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसांनंतर अद्यापही या प्रकरणी कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक सावंत गटाच्या नेत्यांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची कुजबुज नागरिकांत सुरू आहे.
भूम ग्रामीण रूग्णालयात गुरुवारी 20 एप्रिल रोजी शहरातील एका महिलेला तिच्या पतीने औषधोपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. रात्री 8.30 ते नऊ वाजण्याच्या सुमारास महिलेच्या पतीने कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधीक्षक, परिचारिका, साफसफाई कामगारांशी हुज्जत घालून मारहाण करण्यास सुरूवात केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तसेच रूग्णालयातील औषधे, खुर्च्या व इतर साहित्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. यात रूग्णालयातील केबिन, खिडक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हा प्रकार घडत असताना रूग्णालय प्रशासनाने पोलिसांना कुठल्याही प्रकारची कल्पना दिली नाही. मारहाणीचा गोंधळ सुरू असताना रूग्ण व रूग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रूग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्यात घडला प्रकार कैद झाला आहे. मात्र सत्ताधारी गटाचा समर्थक असलेल्या नातेवाईकांच्या दहशतीमुळे कर्मचारी घाबरून गेले आहेत. तक्रारीसाठी अथवा पुढे येवून बोलण्यास कोणीही तयार नाही.
हा प्रकार घडल्यानंतर शहरातील सावंत गटाच्या स्थानिक राजकीय व्यक्तींनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र रूग्णालय प्रशासनाकडून अद्याप कसलीही तक्रार भूम पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेली नाही. या घडलेल्या प्रकारामुळे रूग्णालयातील सर्व कर्मचारी दहशतीखाली काम करीत आहेत.
या रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. खराडे हे काम पाहतात. ते सुट्टीवर असल्याने त्यांचा पदभार डॉ. हनुमंत होनमाने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ज्यावेळी घटना घडली, त्यावेळी डॉ. होनमाने कर्तव्यावर होते. त्यांच्यासोबतही गैरवर्तन झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत डॉ. होनमाने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.
तो नातेवाईक मद्यधुंद - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गलांडे
भूम रूग्णालयात झालेला गैरप्रकार हा एक अपघात आहे. आपल्या पत्नीवर उपचार करण्यासाठी आलेला नागरिक मद्यधुंद अवस्थेत होता. त्या प्रभावाखाली त्याचे पत्नीसोबत भांडण झाले.त्यामुळे रुग्णालयातील साहित्याची तोडफोड झाली. तो रुग्णालयातील साहित्याची तोडफोड भरून ही देणार असल्याचेअसल्याची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली.