Advertisement

राज्यातील निम्म्या अंगणवाड्यांमध्ये नाही पिण्याचे पाणी

प्रजापत्र | Sunday, 06/12/2020
बातमी शेअर करा

बीड  : एकीकडे महासत्ता होण्याच्या गोष्टी केल्या जात असतानाच राज्यातील 53 हजाराहून अधिक अंगणवाड्यांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यात सुमारे 90 हजार अंगणवाड्या आहेत. त्यामुळे निम्म्या अंगणवाड्यांमध्ये अजूनही पाणी पोहचलेले नाही. या अंगणवाड्यांना कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे मोठे आव्हान जलजीवन मिशन समोर आहे.
                      राज्यात जलजीवन मिशनची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यानूसार ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला नळ जोडणी देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. पुढील तीन वर्षापर्यंत सर्वांना नळ जोडणी देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरु असल्याने अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. त्यातूनच राज्यातील अंगणवाड्यांनाच पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याची समोर आले आहे. त्यामुळे या अंगणवाड्यांना कोठूनतरी पाणी आणून बालकांची तहान भागवावी लागते. अंगणवाडीमध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालके असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाणी आणि आहार या बाबतीत अधिक काळजी घेण्याची गरज असते. असे असतानाही अंगणवाड्यांचा पाणी पुरवठा आतापर्यंत दुर्लक्षितच राहिलेला आहे. अनेक ठिकाणी कागदोपत्री नळ कनेक्शन दिल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली नसल्याचे चित्र आहे. राज्यातील 53 हजाराहून अधिक अंगणवाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी नळाची जोडणी देण्यात आलेली नाही. काही ठिकाणी बोअर घेण्यात आले होते. मात्र ते देखील सध्या बंद अवस्थेत आहेत. 

बीड जिल्ह्यात 80 टक्के अंगणवाड्या कोरड्या
राज्यात 50 टक्क्याहून अधिक अंगणवाड्यामध्ये पिण्याचे पाणी कायमस्वरुपी नसल्याचे चित्र असतानाच बीड जिल्ह्यात तर परिस्थिती अधिक विदारक आहे. मिळालेल्या माहितीनूसार जिल्ह्यात तब्बल 80 % अंगणवाड्यांना कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. 

 

शंभर दिवसात नळ जोडणीचे उद्दीष्ट
राज्यात अंमलबजावणी सुरु असलेल्या जलजीवन मिशनमध्ये अंगणवाड्यांचा पाणी पुरवठा हा विषय गांभीर्याने घेण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी राज्य शासनाने अंगणवाड्यांना शंभरदिवसात पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी असे निर्देश दिले होते त्यातील एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही ग्रामपंचायतीच्या पातळीवर किंवा जिल्हा परिषद पातळीवर त्या दिशेने हलचाली झालेल्या नाहीत.

 

हेही वाचा 

 

Advertisement

Advertisement