बीड - गुरुवारी झालेल्या पावसाने तापमानात काहीशी घट झालेली पाहायला मिळत आहे. मात्र हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 23 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता असून येत्या 48 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण निवळत असले तरी काही ठिकाणी गारपीट होत आहे. शुक्रवारी (दि.21) मध्यरात्रीपासून छत्रपती संभाजीनगर, सातारा, अमरावती, नागपूर, अकोला, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यांत हलका पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गुरुवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड व कन्नड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक मोठे बाभळीचे झाड मुळासकट उन्मळून वीज तारांवर पडले. त्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. गुरुवारी पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर, बीड, जळगाव, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला.
याठिकाणी तापमान वाढणार
अवकाळीने ग्रस्त असलेला बळीराजा आणखीनच कोलमडून पडला आहे. पावसासह वाढता उकाडाही दिंवसेंदिवस असह्य होत चालला आहे. विदर्भात तर मे महिना सुरु होण्याच्या आधीच उकाडा वाढला आहे. कोकणासह मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागात तापमानाचा आकडा वाढलेला पाहायला मिळेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अवकाळी पाऊस कधी जाणार?
एकीकडे वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तर दुसरीकडे तापमानातही मोठी वाढ होताना दिसून येत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये उन्हाचा पारा 42 अंशापार गेल्याचे दिसून येत आहे. महिनाभरात मान्सूनला पोषक परिस्थिती तयार होऊ शकते. मात्र अजून अवकाळीनेच राज्यातून काढता पाय घेतलेला नाही.
महाराष्ट्रासह चार राज्यात उष्णतेची लाट
हवामान विभागाने गुरुवारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये मुंबई, पुणे, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडसह देशाच्या अन्य भागांत उष्णतेच्या लाटा निर्माण होणार आहेत. पूर्व उत्तर प्रदेश, मध्य आणि पूर्व भारत, गुजरात आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात तापमान ४० ते ४४ अंश सेल्सियसवर पोहोचण्याची शक्यता आहे.