Advertisement

अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्या आड

प्रजापत्र | Sunday, 06/12/2020
बातमी शेअर करा

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८४व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. गेली पन्नास वर्षे त्यांनी मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून चाहत्यांचे मनोरंजन करण्याचे काम केले. अग्गंबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत त्यांची बबड्याचे आजोबा ही भूमिका चांगलीच गाजली. 

            भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायक अशा भूमिका मिळत गेल्या. त्यानंतर त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. दूरदर्शनवरच्या ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमात प्रसारित झालेल्या आणि अमाप लोकप्रियता मिळालेल्या ‘गप्पागोष्टी’मुळे पटवर्धन यांचा चेहरा घराघरांत पोहोचला. यातील त्यांनी साकारलेला ‘वस्ताद पाटील’ प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहील. सहाव्या वर्षी रवी पटवर्धन यांनी नाटकात काम केलं. १९४४ मध्ये झालेल्या नाट्यमहोत्सवात त्यांनी एका बालनाट्यामध्ये भूमिका केली होती. या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष बालगंधर्व तर स्वागताध्यक्ष आचार्य अत्रे होते. अरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२व्या वर्षीही ते या नाटकात धृतराष्ट्राची भूमिका साकारत होते.

हेही वाचा 

 

Advertisement

Advertisement