Advertisement

चेंगराचेंगरीत ८५ जण मृत्यूमुखी

प्रजापत्र | Thursday, 20/04/2023
बातमी शेअर करा

यमनची राजधानी साना येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ८५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हुतीतील एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ओल्ड सिटीत व्यापाऱ्यांकडून गरिबांना आर्थिक मदत देण्याकरता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात शेकडो गरीब लोक सहभागी झाले आणि एकच गोंधळ निर्माण झाला व चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. त्यात ८५ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

 

मंत्रालयाचे प्रवक्ते, ब्रिगेडियर अब्देल-खलिक अल-अघारी यांच्या आरोपानुसार, मदत वितरीत करण्याच्या कार्यक्रमात स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय न राखता कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामुळं ही दुर्घटना घडली आहे. एका स्थानिक वृत्त वाहिनीनुसार, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या आकड्यानुसार जवळपास ८५ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर १३ जण गंभीर जखमी आहेत.

 

 

ज्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या शाळेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसंच, दोन आयोजकांना ताब्यात घेतलं आहे. तिथे असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला होता. मात्र गोळी एका विजेच्या तारेला लागली त्यामुळं मोठा विस्फोट झाला. त्यामुळं तिथे जमलेल्या लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला, असं काही लोकांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका मोठ्या परिसरात मृतदेह जमीनीवर पडलेले दिसत आहे. तर आजूबाजूला लोक आक्रोश करताना दिसत आहे.

 

Advertisement

Advertisement