बीड-त्यांचं नावं तसं रमाकांत कुलकर्णी,पण त्यांच्या मित्र परिवारात असेल किंवा कार्यालयीन वर्तुळात, त्यांची ओळख होती ती आर.वाय.म्हणूनच. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात प्रदीर्घकाळ सेवा करताना अगदी गावपातळीवर आरोग्य कर्मचारी म्हणून काम करण्यापासून ते प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यापर्यंत आणि स्वतःआजारी असतानाही कोविड काळात थेट आघाडीवर जाऊन सेवा बजावणारे कर्मचारी म्हणून ते परिचित होते.सदैव हसतमुख चेहरा, मदत करायला तत्पर आणि स्वभावाने कमालीचे संवेदनशील असणारे आर.वाय.म्हणजे मित्र परिवारासाठी एक लोभस व्यक्तिमत्व होते. त्या आर.वाय.यांचे अकाली जाणे म्हणूनच सर्वांना मोठा धक्का आहे.
रमाकांत कुलकर्णी उर्फ आर.वाय. हे आरोग्य विभागात नोकरीला लागले, त्यांची नोकरी गेवराई तालुक्यातील दुर्गम भागात, त्या गावात वाहन देखील लवकर पोहचायचे नाही, आणि अशा गावात नव्यानेच लग्न झालेले आय.वाय. काम करायचे, अनेक दिवस कुटुंबाची देखील भेट व्हायची नाही. प्रवास करावा लागायचा, मात्र आरोग्य सेवेतले हे दिव्य आर.वायनी लीलया पेलले. त्यांचा जनसंपर्क मात्र मोठा होता. नंतरच्या काळात ते आरोग्य कर्मचारी संघटनेच्या बांधणीत कामाला लागले. प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांच्या जोडीने त्यांनी जिल्ह्यात संघटना बांधणीमध्ये स्वतःला झोकून दिले आणि त्यामुळेच बीड जिल्ह्यात एक चांगली संघटना उभी राहू शकली.आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलने असतील किंवा इतर काही प्रश्न,ते सोडविण्यासाठीच्या आंदोलनात आर.वाय. नेहमी पुढे असायचे. मित्र परिवाराच्या बाबतीत देखील ते फार संपन्न होते.त्यांचा मित्रपरिवार फार मोठा,नातेवाईकांचा गोतावळा देखील मोठा.मित्र परिवार असेल किंवा नातेवाईक, ते जिथे जातील तेथले होऊन जायचे.प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करायचे,म्हणूनच ते सर्वांचे लाडके होते.
नोकरी करताना त्यांनी अनेकदा आरोग्याकडे देखील दुर्लक्ष केले. नोकरीच्या ठिकाणी लोभस, हसरे आणि संवेदनशील असणारे आर.वाय.,स्वतःच्या शरीराकडे मात्र म्हणावे तसे लक्ष देऊ शकले नाहीत. काही महिन्यांपूर्वी त्यांना मूत्रपिंडाचा त्रास झाला. त्यावेळी त्यांच्या पत्नी रोहिणी यांनी त्यांना स्वतःचे मूत्रपिंड दिले. त्यावेळी लवकरच हसरे, खेळकर आर.वाय. आपल्यात परत येतील, पुण्याहून उपचार पूर्ण करून पुन्हा मित्रपरिवारात येतील असेच सर्वांना वाटत होते. मात्र नियतीला कदाचित काही तरी वेगळेच मंजूर होते. नियतीने आर.वाय. यांच्यावर घाला घातला आणि कुटुंबापासून, मित्र-परिवारापासून त्यांना हिरावून घेतले. या लोभस व्यक्तिमत्वाचे अकाली जाणे चटका लावणारे आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
बातमी शेअर करा