'शिवसेनेचे 40 आमदार फोडून भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यातले 16 जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अपात्र ठरतील म्हणून सत्ता वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तेवढेच आमदार ईडी, सीबीआयच्या मदतीने फोडायचे असे कारस्थान चालले आहे. ते 16 कोण?', असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भविष्यात काय करतील? 15 आमदारांसह ते भाजपात सामील होतील असे शिंदे व भाजपचे आमदार छातीठोकपणे सांगत होते. या सगळ्यांवर परखड खुलासा अजित पवार यांनीच करायला हवा.
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, भाऊबंदकी हा मानवजातीला दिलेला शाप असेल, परंतु सत्तेसाठी माणसे कोणत्या थराला जातात याचे अनेक धडे इतिहासात आणि वर्तमानातही आपण पाहत असतो. महाराष्ट्राला व मराठ्यांना दुहीचा शाप आहे व ती दुही घरातूनच सुरू होते. ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलाच आहे. त्यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर ईडीच्या धाडी पडल्या व कारखाना जप्त केला, पण आता यासंबंधात ईडीने जे आरोपपत्र दाखल केले त्यात अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव नाही. मग जरंडेश्वर खरेदीच्या व्यवहारातील मनी लॉण्डरिंगच्या आरोपांचे काय झाले? की ते सर्व आरोप आणि धाडी राजकीय दबावासाठीच होत्या? असे दहशत व दबावाचे राजकारण महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते.
मुश्रीफांवर दबाव
संजय राऊत म्हणाले, हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबावर भाजपने हल्ले सुरू केले. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहाराचे हे प्रकरण. मुश्रीफ यांनी जेरीस येऊन भाजपात जावे असा एकंदरीत खटाटोप आहे. मुश्रीफ हे शरद पवार यांचे विश्वासू, पण तुरुंगात कोणालाच जायचे नाही. एकनाथ शिंदे यांनाही तुरुंगात जायचे नव्हते. म्हणून त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. ते सरळ बेइमानांचे सरदार झाले.