पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. याबबात वसंत मोरे यांनीही अनेकवेळा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
यानंतर आता वसंत मोरे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर एकाच गाडीतून प्रवास केला आहे. त्यामुळे वसंत मोरे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
बुधवारी वसंत मोरे आणि सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कात्रज चौकातील पुलाच्या कामाची पाहाणी केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याचीही माहिती आहे.
कात्रज चौकातील पुलाच्या कामाची पाहाणी झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''वसंत मोरे आणि आमचा मागील १३ वर्षांचा प्रवास आहे. आम्ही समन्वयाने काम करतो'', असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे वसंत मोरे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, ''गेल्या १३ वर्षांचा हा प्रवास आहे. माझं म्हणणं आहे की एकदा निवडणूक झाली की विकासाच्या कामात आमचे काहीच मतभेद नाहीत. आम्ही समन्वयाने काम करतो. १३ वर्षामध्ये मला वसंत मोरे यांची मदतच झाली असेल, कदाचित माझा त्यांना त्रास झाला असेल. यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही'', असं सुळे म्हणाल्या.