बीड : राज्य विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल भाजपला धक्का देणारे ठरले. खरेतर ज्यावेळी या जागांसाठी उमेदवारी जाहीर झाली, त्याचवेळी भाजपमधील धुसफूस समोर आली होती, मात्र तरीही भाजपच्या राज्यातील नेतृत्वाने आपलेच म्हणणे रेटून नेले होते. त्याचा परिणाम निकालात दिसून आला . औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील निकाल तर अपेक्षित असाच होता , पण नागपूर पद्वीधरची 5 दशकापासूनची आणि पुणे पद्वीधरची 2 दशकापासूनची जागा देखील भाजपला राखता आली नाही. नागपूर म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोघांचीही कर्मभूमी. नागपूर पदवीधर मतदारसंगाचे नेतृत्व स्वतः नितीन गडकरींनी केलेले , तरीही हा मतदारसंघ भाजपला राखता येत नसेल तर हे का झाले याचा विचार करावा लागणार आहे. पुणे पद्वीधरमधून चंद्रकांत पाटील निवडून यायचे, पण इथेही भाजपला धक्का बसला. काही दिवसांपूर्वी बिहार विधानसभेच्या आणि काही राज्यातील झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाल्यानंतर मोदींचा, भाजपचा करिष्मा अजूनही कायम असल्याचे भाजपकडून उच्चरवात सांगितले जात होते, मग महाराष्ट्रातच असे काय घडले ?
आता निकाल लागल्यानंतर फडणवीस ’होय आमची रणनीती चुकली , आम्ही तीन पक्षांच्या एकत्रित ताकतीचा अंदाज बांधायला कमी पडलो ’ असे म्हणत आहेत, मात्र ही पश्चातबुद्धी आहे. समोरच्या व्यक्तीचा अंदाज बांधता येणे हेच राजकारणात महत्वाचे असते. मात्र फडणवीसांच्या बाबतीत बोलायचे तर 5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांच्यात सत्तेचा दर्पच मोठ्याप्रमाणावर दिसला, अगदी विधानसभा निवडणुकीत ’आमच्यासमोर पहेलवानच नाही ’ हे जे त्यांचे वक्तव्य होते, ते त्या दर्पातूनच आले होते. सत्ता गेल्यानंतरही तो दर्प कमी झालेला नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे सध्याच्या भाजप नेतृत्वाला , हा पक्ष कोणामुळे उभा राहिला याचे भान राहिलेले नाही, किंवा त्यांना ते समजून घ्यायचे नाही. म्हणूनच एकनाथ खडसेंसारखा नेता पक्ष सोडायला भाग पडला जातो. तर आज जे पक्षात आहेत,मग त्या पंकजा मुंडे असतील किंवा रावसाहेब दानवे किंवा चंद्रशेखर बावनकुळे , कोणत्याच नेत्याच्या नाराजीची चर्चाच करायची नाही, किंवा चिंताच करायची नाही , हा जो प्रकार भाजपात सुरु आहे , तो या पक्षाला भोवला असेच म्हणावे लागेल. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील, जोडीला गिरीश महाजन म्हणजे सारा पक्ष असे समीकरण मांडले जात आहे, आणि तेथेच घात होत आहे. पक्षासाठी ज्या नेत्यांनी हाडाची काडे केली , त्या नेत्यांना विश्वासात न घेता उमेदवार लादले जात असतील तर त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी कामे करायची कशी ? मध्यंतरी माध्यम क्षेत्रातील ’लष्करे देवेंद्र ’ ची चर्चा होती, मात्र महाराष्ट्रात भाजप पक्षालाच ’लष्करे देवेंद्र ’ करण्याचा आणि जे कोणी त्यात सहभागी होणार नाहीत त्यांना अडवण्याचा , एकटे पडण्याचा प्रकार भाजपात वाढला. भागवत कराड किंवा रमेश कराड यांना उमेदवारी देताना पंकजा मुंडेंना विचारायचे नाही, संदीप जोशींची उमेदवारी जाहीर करताना गडकरींशी चर्चा करण्याची नाही , खडसे गेले काय किंवा जयसिंग गायकवाड यांनी पक्ष सोडला काय , कशाचीच गांभीर्याने दखल घ्यायची नाही, या एकाधिकारशाहीला सामान्य मतदारांनी दिलेली हि चपराक आहे. नेत्यांनी प्रचार केला , मात्र नेत्यांची देहबोली आणि त्यांचे चेहरे जे काही वेगळे सांगत होते, ते कार्यकर्त्यांनी नेमके हेरले हेच या निवडणूक निकलांमधून समोर आले आहे. जनतेत स्थान असणार्या नेत्यांना बाजूला करून होयबांच्या हाती सूत्रे देण्याचे जे राजकारण देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी चालवले होते, त्याचा परिपाक म्हणून मतदारांनी, भाजपच्याच कार्यकर्त्यांनी भाजपला झिडकारले आहे. याचा विचार आतातरी भाजपच्या नेतृत्वाने करायला हरकत नाही.
हेही वाचा