मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. मुख्यमंत्र्यांसह मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही अयोध्येला गेले आहेत. मुख्यमंत्री अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन सायंकाळी शरयूतीरी महाआरती करणार आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.शरद पवार म्हणाले, “हा श्रद्धेचा प्रश्न असल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले आहे. त्यांची श्रद्धा अयोध्येत आहे. आमची श्रद्धा शेतकऱ्यांवर आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीशी निगडीत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसत, संकटातून त्याला मदत कसे करता येईल, यावर आमची श्रद्धा आहे. प्रत्येकाचे धोरण वेगळे असू शकते.”“कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार आहे. तिथे काँग्रेस सत्तेवर येणार आहे. लोकांना बदल हवा आहे. तो बदल भाजपाला घरी बसवणार आहे,” असेही शरद पवारांनी म्हटलं.
संजय राऊतांची शिंदे गटावर टीका
“एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना आम्हीच अयोध्येला घेऊन गेलो होते. सत्यवचनी प्रभू श्रीरामच्या दर्शनाला अयोध्येत जाणे हा एक आनंद असतो. पण, रामाचे सत्यवचन तुम्ही कोठून घेणार आहात? जेव्हा पक्ष सोडला, बेईमानी केली सुरत आणि गुवाहाटीला दर्शनासाठी गेला. तेव्हा रामाची आठवण झाली नाही,” असे टीकास्र संजय राऊतांनी शिंदे गटावर सोडले आहे.