Advertisement

कोरोनाच्या लाटेचं सावट!

प्रजापत्र | Friday, 07/04/2023
बातमी शेअर करा

मागील काही दिवसांपासून देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोना चाचणी आणि जीनोम सिक्वसिंगसह कोरोना नियमांचे पालन करण्यावर या बैठकीत चर्चा झाली. 

 

सतर्क राहण्याची आवश्यकता
केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी सांगितले की, आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. लोकांमध्ये अनावश्यकपणे भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधांचा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना दिले. त्याशिवाय राज्यांतील आरोग्य मंत्र्यांनी रुग्णालयाचा दौरा करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. देशभरात 10 आणि 11 एप्रिल रोजी संपूर्ण देशात मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीच्या दरम्यान कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारांनी आपल्या पातळीवर कोरोना महासाथीचा सामना करण्यासाठी योग्य तयारी करण्याचेही सूचना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली. लोकांना अधिक जागरूक करण्याची आवश्यकता असून त्यात कोणताही हलगर्जीपणा करता कामा नये, असेही त्यांनी म्हटले. 

Advertisement

Advertisement