बीड दि. 4 (प्रतिनिधी): बीड जिल्ह्याच्या राजकारणात, बीड मतदारसंघाचे राजकारण करतानाही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी गेवराई मतदारसंघात एक हातचा ठेवलेला असायचा, तो हातचा असायचा बदामराव पंडितांचा . मात्र मागच्या काळात गेवराईत बदामराव पंडितांच्या राजकारणाला हादरे बसू लागले आणि इकडे बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांचीही भाजपशी म्हणा किंवा फडणवीसांशी जवळीक वाढली. त्यातूनच त्यांनी गेवराईत आ. लक्ष्मण पवार यांचाही मैत्रीचा हात हातात घेतल्याचे दिसत आहे. बाजार समिती निवडणुकीत ‘ढिल्ले पडू नका’ असा सल्ला यातूनच जयदत्त क्षीरसागरानी दिला आणि त्यातूनच मग गेवराई बाजार समितीसाठी बदामराव पंडित आणि आ. लक्ष्मण पवारांचे गट एकत्र आल्याची राजकीय चर्चा सध्या जोरात आहे.
बीड जिल्ह्यात 9 बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यात गेवराई आणि बीड बाजार समिती जास्तच चर्चेत आहे. बीड बाजार समितीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाचा कायम प्रभाव आहे तसाच गेवराई बाजार समितीवर माजी आ. अमरसिंह पंडित गटाचा. या दोन्ही ठिकाणी या दोन नेत्यांच्या प्रभावाला धक्का लावण्यात विरोधकांना फारसे यश मिळालेले नाही.
गेवराई मतदारसंघाच्या पंडित विरुद्ध पंडित या राजकारणात आ. लक्ष्मण पवारांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करून दोन्ही पंडितांना धक्का दिला. मात्र पवार हे बाजार समितीच्या राजकारणात कधी फारसे सक्रिय नसायचे .यावेळी मात्र परिस्थिती उलटी आहे. गेवराई बाजार समितीत आ. लक्ष्मण पवारांनी लक्ष घातले आहे आणि सोबतीला घेतले आहे ते बदामराव पंडितांना आणि या युती मागे सल्ला असल्याचे चर्चिले जाते तो जयदत्त क्षीरसागरांचा .
बीड जिल्ह्यात राजकारण करताना जयदत्त क्षीरसागरानी गेवराई मतदारसंघात कायमच एक हातचा ठेवलेला, तो म्हणजे बदामराव पंडित. बदामराव पंडित यांच्यामागची राजकीय ताकत म्हणजेच जयदत्त क्षीरसागर असे म्हटले जाते. त्याच जयदत्त क्षीरसागरानी यावेळी चक्क बीड बाजारसमितीच्या कार्यक्षेत्रात आ. लक्ष्मण पवारांसोबत मेळावा घेतला. क्षीरसागर - पवारांचे एकत्र येणे तसे सर्वांसाठीच आश्चर्याचे , आता त्याच एकत्रीकरणातून क्षीरसागरानी पवारांना बाजार समिती निवडणूक निकराने लढवा असा सल्ला दिला असल्याचे समजते. आणि यासाठीच बदामराव पंडितांना देखील पवारांच्या जोडीला जोडून देण्यात आले असेही चर्चिले जात आहे. नव्या दोस्ताचा सल्ला म्हणा किंवा राजकारणातील अपरिहार्यता , आ. पवारांनीही ’पंडित मुक्त गेवराईची ’ शपथ विसरून बाजारसमितीसाठी तरी बदामराव पंडितांना सोबत घेतले आहे. आता ही समीकरणे गेवराई मतदारसंघात काय काय बदल घडविणार हे मात्र काळच ठरवेल.