नवी दिल्ली : तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ट्रस्टने पीएफवरील व्याजदरात वाढ केली आहे. म्हणजेच भविष्य निर्वाह निधीवर आता तुम्हाला अधिक व्याज मिळेल. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सरकारने EPF व्याजदर ८.१०% वरून ८.१५ टक्के इतका वाढवला आहे. यामुळे ईपीएफ सदस्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी, सीबीटीने ईपीएफ दर ४० वर्षांतील सर्वकालीन नीचांकी पातळीवर आणला होता. मात्र, २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या ८.५५% तुलनेत व्याजदर अजूनही कमी आहे.
लक्षात घ्या की कर्मचार्यांचे पीएफ योगदान त्यांच्या EPF खात्यात मासिक आधारावर जमा केले जाते आणि दरमहा व्याज मोजले जाते, पण एकूण व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा केले जाते. दरम्यान, एपीएफओच्या या दिलासादायक निर्णयानंतर आता तुम्ही तुमच्या ईपीएफ व्याज दराची गणना कशी कराल याबाबत सविस्तर जाणून घेऊया. अर्थमंत्रालयामार्फत सरकारची मान्यता मिळाल्यानंतरच EPFO व्याजदरात बदल करते.
EPF व्याज दराची गणना करण्यासाठी आवश्यक तपशील
कर्मचाऱ्याचे सध्याचे वय.
वर्तमान EPF शिल्लक.
मासिक मूलभूत आणि कमाल रु. १५,००० पर्यंत महागाई भत्ता.
EPF मध्ये योगदानाची टक्केवारी.
निवृत्तीचे वय.
EPF व्याज दर कसा मोजायचा?
पीएफ खात्यातील जमा रकमेवरील गणित एका उदाहरणाने समजून घेऊ. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार रु. ४५,००० आणि व्यक्ती एप्रिल २०२२ मध्ये कंपनीत रुजू झाली तर त्याच्या PF व्याजाची गणना खालीलप्रमाणे असेल:
एक लक्षात घ्या की जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार रु. १५,००० पेक्षा जास्त असेल, तर रु. १,२५० EPS खात्यात हस्तांतरित केले जातात. म्हणजे रु. ४५,००० पैकी ८.१५% दराने रु. ३,६६७ होते आणि रु. १२५० रुपये वजा केल्यावर उर्वरित रक्कम EPF खात्यात हस्तांतरित केली जाईल. जर EPF व्याज दर ८.१५% असेल तर मासिक आधारावर ०.००६७५% (अंदाजे) व्याजदर आकारला जाण्याची शक्यता आहे.