बीड दि.20 ः तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतातील विहीरीच्या अंतीम देयकासाठी 10 हजार रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य केले. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या प्रकरणी लाच मागणार्या ग्रामसेवकावर सोमवारी (दि.20) धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजाभाऊ मधुकर मुंडे (वय 35 रा.कोठारबन ता.वडवणी) असे लाच मागणार्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ते धारुर तालुक्यातील गावंदरा येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदारांच्या वडिलांचे नावे असलेल्या शेतामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत मंजूर जलसिंचन विहीरीचे अंतिम देयकाचा 98 हजार 400 रुपयांचा धनादेश देण्यासाठी पंचासमक्ष 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडअंती 10 हजार स्विकारण्याचे मान्य केले. त्यानंतर तक्रारदाराने पुढील कारवाई करण्यास असमर्थता दर्शविल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी फिर्यादी होवून तक्रार दिली. या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत अमलदार सत्यनारायण खेत्रे, अमोल खरसाडे, सुरेश सांगळे, भरत गारदे, संतोष राठोड यांचा सहभाग आहे.