बीड - चोरीला गेलेले सोने पुन्हा मिळणे ही दुर्मिळ गोष्ट असताना बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसऱ्यांदा असा चमत्कार घडल्याचे समोर आले आहे. घरातील वृद्ध दाम्पत्याचे आठ तोळे सोने आणि नगदी रक्कम असा साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. बीड शहर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास गतीने करत अवघ्या २४ तासांच्या आत चोरीला गेलेले सोने आणि नगदी रक्कम मिळवून दिली आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कौतुक करण्यात येतं आहे. चोरीला गेलेले सोने असेल अथवा नगदी रक्कम ती परत मिळणे अवघड असते. अगदी पोलिसांना ही आरोपी ताब्यात घेऊन मुद्देमाल परत मिळवून देण्यासाठी मोठा कस लावावा लागतो. मात्र बीडच्या धांडे गल्लीतील लता हरिहर काळे (वय-६५) यांच्या घरातून ८ तोळे सोने आणि १६ हजार ८०० नगदी रक्कम असा साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी डिबी पथक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांच्या चौकशीतून ही चोरी त्यांच्या परिवारातील किंवा जवळच्या व्यक्तींकडून करण्यात आल्याचा अंदाज वर्तविण्यात येतं होता. त्यानुसार कसून चौकशी केल्यानंतर अज्ञात चोरट्यानी चोरीला गेलेले सोने आणि नगदी रक्कम पुन्हा काळे यांच्या घरात आणून ठेवली. दरम्यान बीड शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे चोरीला गेलेले सोने २४ तासांच्या आत फिर्यादीना मिळाले. दरम्यान यासाठी सपोनि श्री. ढाकणे, पोउनि श्री.पवार, डिबी पथकातील बाळासाहेब सिरसाट, सय्यद अशपाक, अविनाश सानप, मनोज परजने, श्री.पवार यांनी परिश्रम घेतले.
महिनाभरात दुसऱ्यांदा घडला असा प्रकार
बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साधारण महिनाभरापूर्वी एका लग्नानिमित्त आलेल्या महिलेचे सोने लंपास करण्यात आले होते. याप्रकारणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून कसून चौकशी केली असता फिर्यादीच्या घरासमोर अज्ञात व्यक्तीने सोने आणून ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आज पुन्हा एका वृद्ध दाम्पत्याचे आठ तोळे सोने आणि नगदी रक्कम असा साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास झाल्यानंतर पोलिसांच्या तत्परतेमुळे सोने आणि नगदी रक्कम मिळवून आली आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक रवी सानप आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे याबद्दल कौतुक करण्यात येतं आहे.