Advertisement

शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार संपकरी

प्रजापत्र | Sunday, 19/03/2023
बातमी शेअर करा

बीड दि.१९ (प्रतिनिधी)-राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक १४ मार्चपासून सुरु केलेल्या बेमुदत संपात  सहभागी आहेत. परंतु मागील दोन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे  झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाला देण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला आहे.

 

बीड जिल्हयात काही तालुक्यात काही गावात अवकाळी पाऊस व गारपिट चालू आहे. या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचे, वित्त व प्राणहानीचे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक हे संपात सहभागी असतांनादेखील शेतकरी बांधवांना तातडीने आर्थिक लाभ मिळावेत, नुकसान भरपाई मिळावी, या मानवतेच्या दृष्टीकोनातून संवेदनशीलतेने नोंदी गावात, शेतात जावून त्या- त्या तहसिलदारांच्या ग्रुपवर अपलोड करतील परंतु संपावर असल्याने स्वाक्षऱ्या करणार नाहीत.अशा प्रकारचा तातडीचा निर्णय तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या संघटना प्रमुखांशी चर्चा करून समन्वय समितीचे जिल्हा अध्यक्ष बाबा बडे, सरचिटणीस रामचंद्र ठोसर, कार्याध्यक्ष गजानन जाधव, उपाध्यक्ष परमेश्वर राख, संजय हंगे, एस.पी. जगताप व मार्गदर्शक डी. जी. तांदळे यांनी घेतल्याची माहिती समितीचे निमंत्रक राजकुमार कदम यांनी दिली आहे..
 

Advertisement

Advertisement